पुणे : तलावात बुडणाऱ्या मित्राला वाचवायला दोघे गेले, तिघांही युवकांचा बुडून मृत्यू, दौंड येथील घटना | पुढारी

पुणे : तलावात बुडणाऱ्या मित्राला वाचवायला दोघे गेले, तिघांही युवकांचा बुडून मृत्यू, दौंड येथील घटना

दौंड : पुढारी वृत्तसेवा

दौंड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात रविवारी (दि. ६) सायंकाळी बुडून तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला. यामध्ये असरार अब्दुल अलिम काझी (वय २१), त्याचा चुलत भाऊ करीम अब्दुल हादि काझी (वय २०) आणि फरीद शेख (वय २०, सर्व रा. नवगिरे वस्ती, दौंड) यांचा समावेश आहे.

दौंड शहरातील तिघे युवक असरार अब्दुल अलिम काझी, करीम अब्दुल हादि काझी आणि फरीद शेख रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरानजीक असलेल्या तलावावर फोटोशूट व पोहोण्यासाठी गेले होते. या तिघांनाही पोहता येत नव्हते. या तिघांनी आपले कपडे व मोबाईल काढून बाहेर ठेवले व पाण्यात उतरले. आपला मित्र बुडू लागल्याने त्याच्या दोन साथीदारांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला व एकामागोमाग एक असे तिघेही पाण्यात बुडाले.

रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी शोधाशोध केली, परंतु त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यांच्या मित्रांकडे माहिती मिळाली की ते फोटोशूट करण्यासाठी तळ्यावर जाणार आहेत. त्या ठिकाणी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिसांनी आजुबाजूची पाहणी केली.

यावेळी काठावर त्यांचे कपडे व मोबाईल आढळून आले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांचे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने हे मृतदेह रात्री एकच्या सुमारास हाती लागले. असरार अब्दुल अलिम काझी आणि त्याचा चुलत भाऊ करीम अब्दुल हादी काझी आणि फरीद शेख अशी त्यांची नावे आहेत. या तिघांच्या मृत्यूमुळे नवगिरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

Back to top button