मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थाना बाहेर सकाळीच आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले. अधिवेशन सुरू असताना अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. वनजमिन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, हे आंदोलन वनजमिनीच्या हक्कासाठी सुरू आहे. आदिवासी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. अद्यापही वनजमिनीवरील आदिवासींचे दावे मान्य करण्यात आले नाहीत.
आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील महिन्यात आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले.