Baramati : पतसंस्थेविरोधात कारवाई होत नसल्याने शासकीय कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

Baramati : पतसंस्थेविरोधात कारवाई होत नसल्याने शासकीय कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील एका पतसंस्थेविरोधात कारवाई होत नसल्याने येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात एकाने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. विलास महादेव कोकरे (रा. ढाकाळे, ता. बारामती) असे त्याचे नाव आहे. यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी दादासाहेब डोईफोडे यांनी याबाबत फिर्याद दिली. (Baramati)

पतसंस्थेने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत कोकरे यांनी शुक्रवारी (दि. २५) सहाय्यक निबंधक कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यांनी आंदोलन करू नये यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून त्यांना कलम १४९ प्रमाणे नोटीस दिली होती. परंतु त्यांनी ती स्विकारली नाही. त्यामुळे शुक्रवारी या कार्यालयात पोलिस थांबून होते. दुपारी एकच्या सुमारास कोकरे यांनी तेथे येत एका कापडी पिशवीतून रॉकेल आणत ते कार्यालयातील कागदपत्रांवर फेकत तसेच स्वतःच्या अंगावर ओतून घेतले.

कार्यालयात उपस्थित पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. आत्महत्या करून प्रश्न सुटणार आहे का? तुमचा जो प्रश्न आहे, तो कायदेशीर मार्गाने सोडविण्यासाठी पोलीस खात्यांकडुन प्रयत्न करू असे फिर्यादी बोलले असताना त्यांना ढकलून दिले. शहर पोलिस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याला हाताने मारहाण करत सरकारी कामात कोकरे यांनी अडथळा आणला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. (Baramati)

हेही वाचलतं का?

Back to top button