कीव्ह; पुढारी ऑनलाईन
युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील रस्त्यावर आता रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये (Russia-Ukraine conflict) जोरदार लढाई सुरु आहे. याच दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian president Volodymyr Zelenskyy) यांनी सेल्फी स्टाइलमधील एक व्हिडिओ शूट करून तो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले आहे.
"मी इथेच आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही देशासाठी लढू. कारण आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहे." असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. त्यांनी शरणागती पत्करली अथवा पलायन केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन तसेच पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांशी राजनैतिक पातळीवर चर्चा केली जात आहे. मित्रराष्ट्रांकडून शस्त्रांची मदत असून युद्धविरोधी भूमिका कायम असल्याचे त्यांनी झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी कीव्हमध्ये तीव्र लढाई सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. कीव्ह शहरातील वासिल्किव भागात जोरदार संघर्ष सुरु असल्याची माहिती युक्रेनियन सशस्त्र दलाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. रशियाच्या लष्करी विमानावर हल्ला केला असून यात शत्रुचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनियन सशस्त्र दलाने म्हटले आहे.
हवाई हल्ल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील रस्त्यांवर संघर्ष सुरु आहे. रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या काळ्या समुद्रातील एका बेटावर रशियन सैनिकांनी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली असताना युक्रेनच्या सैन्याने रशियाचे १००० सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारपेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या संरक्षण विभागाने दुजोरा दिला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे नाझी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना हटवून युक्रेनियन लष्कराने सत्ता हातात घ्यावी, म्हणजे वाटाघाटी करणे सुलभ होईल, असे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. इकडे रशियाने युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरही जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. कीव्हच्या उत्तर भागात रशियन रणगाडे दाखल होत असल्याचे एक चित्रणही समोर आले आहे. मध्यरात्रीनंतर एका अपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्याने शेकडो नागरिक जखमी झाले. कीव्ह शहराला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूने ठरवून टाकलेले आहे, असे हताश उद्गार कीव्हचे महापौर व्हिटाली क्लिटस्च्को यांनी काढले आहेत.