

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचा जगभरात गौरव व्हावा, यासाठी लवकरच वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका होणार आहे. 'हा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनानाच्या विविध योजनांतून भरीव निधी दिला जाणार आहे,' असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी वेल्हे येथील शिवसेना मेळाव्यात केले.
'राज्यावर सातत्याने नैसर्गिक आपत्ती कोसळत असताना पंतप्रधान शेजारी राज्यांची पाहणी करून जातात; मात्र महाराष्ट्रात येत नाहीत. राज्याला आर्थिक मदत न करता दररोज शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करून भाजप शिवसेनेला बदनाम करतात,' असा आरोप अहिर यांनी केला. मेळाव्यात वेल्हे तालुका शिवसेना कार्यकारणी नियुक्ती, पक्षप्रवेश, गुणवंत खेळाडूंचा सन्मान अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, युवा सेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, भोर विधानसभा संघटक शैलेंद्र वालगुडे, शिवसेनेचे वेल्हे तालुकाप्रमुख दीपक दामगुडे, सुनील शेंडकर, गोपाळ दसवडकर, तुषार येनपुरे, उमेश नलावडे, गणेश उफाळे, जयश्री शेंडकर, कल्पना ओंबळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिवसेना स्वबळावर व पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट करत अहिर यांनी सहकारी पक्षांनी महाआघाडीचा धर्म पाळला, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल, असे सांगितले. 'राज्यात आघाडी असली, तरी भोर विधानसभा मतदारसंघात बिघाडी असल्याचे चित्र आहे. शासकीय विकासकामांत मुख्यमंत्र्यांचे नाव, फोटो असणे आवश्यक आहे; मात्र येथे तसे नाही. शासन महाविकास आघाडीचे आहे. बिघाडी करण्याचे काम करू,' असा इशारा त्यांनी दिला.