

पुणे : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांचे पाच गट इतर राज्यांचा अभ्यास दौरा करणार आहेत. त्यातील पहिला गट रवानाही झाला आहे. परंतु, आता उर्वरित अधिकार्यांचा दौरा रद्द करा, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली आहे.
पदाधिकार्यांचा कालावधी संपण्यापूर्वी कामांचा निपटारा होणे गरजेचे आहे. अधिकार्यांच्या परराज्य दौर्याबाबत पदाधिकार्यांना विश्वासात घेतले गेले नाही. शंभर दिवसांचा कार्यक्रम अर्धवट आहे तसेच सध्या प्रशासकीय कामकाजाची तातडीची गरज आहे, असे असताना अधिकारी दौर्यावर पाठविणे योग्य नाही. दौर्याचे पुढचे टप्पे थांबवावेत, अशी मागणी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली. अधिकार्यांच्या दौर्याविषयी कोणतीच माहिती दिली गेली नाही. अधिकारी रवाना झाल्यानंतरच कळाले, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
बारामती पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळी ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सीईओ आयुष प्रसाद यांनी अधिकार्यांच्या परराज्यातील अभ्यास दौर्याबद्दल अवगत केले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, की पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी कशाला पाठविता, उलट त्याच राज्यातील अधिकार्यांना आपली जिल्हा परिषद बघण्यासाठी आणि अभ्यासासाठी बोलवा, असा सल्ला दिला होता, असे एका पदाधिकार्याने सांगितले.