पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आता मुदत संपत असतानाच संस्थांच्या नावाखाली महापालिकेच्या मिळकती नाममात्र दराने लाटण्याचे काम केले आहे. सर्वसाधारण सभेत गुरुवारी महापालिकेच्या जागा आणि मिळकती संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या संस्थांना देण्याचे तब्बल 28 प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत.
महापालिकेच्या मालकीच्या शेकडो मिळकती नगरसेवकांच्या संस्थांकडे नाममात्र दराने भाड्याने आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याने त्या ताब्यात घेण्याचे सत्ताधारी भाजपने जाहीर केले होते. असे असतानाच महापालिकेच्या व्यायाम शाळा, बहुद्देशीय केंद्र, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका अशा विविध स्वरूपाच्या मिळकती विविध संस्थांना देण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी होते. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी या प्रस्तावांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी अनुमोदन देऊन त्यांना पाठिंबा दिला.
जवळपास 15 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी या मिळकती नाममात्र भाड्याने देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. या मिळकतींमध्ये कोंढवा येथील विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा, कोथरूड येथील मयूर आयडियल डीपी रस्त्यावरील क्रीडांगण, बहुद्देशीय हॉल, पर्वतीमधील भारतमाता अभ्यासिकेमधील इमारतीमधील मजला अशा स्वरूपाच्या मिळकतींचा समावेश आहे. हे प्रस्तावास मंजुरी देताना काही उपसूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या मिळकतींचे वाटप करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या जागा अवघ्या एक रुपया भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रकारांना लगाम लावण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार 2008 मध्ये जागावाटप नियमावली करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून जागांचे वाटप करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या प्रस्तावांवर प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचलंत का?