

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : शिवसेेनेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जात असलेल्या कोथरूड परिसरात नवीन प्रभागरचनेमुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पारडे जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने हा भाग जिंकला होता. या वेळी भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नवीन प्रभाग क्रमांक 31 (कोथरूड गावठाण शिवतीर्थनगर) मध्ये जुना प्रभाग क्रमांक 12 (मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी) चा साठ टक्के, प्रभाग 11 (रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर) चा 25 टक्के, तर जुना प्रभाग 10 (बावधन, कोथरूड डेपो) चा 15 टक्के भाग आला आहे. प्रभाग 12 मध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, भाजपच्या हर्षाली माथवड व वासंती जाधव, प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादीचे दीपक मानकर, काँग्रेसचे चंदू कदम व वैशाली मराठे, भाजपच्या छाया मारणे, प्रभाग 10 मध्ये भाजपचे दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे हे विद्यमान नगरसेवक आहेत. नव्या प्रभागात या नगरसेवकांपैकी जुन्या प्रभाग बारातील सुतार, माथवड, जाधव हे तिघेच प्रमुख इच्छुक आहेत. महापौर मोहोळ लगतच्या प्रभाग 33 (बावधन खुर्द, महात्मा सोसायटी) मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने येथील प्रभागरचना या भागातील विविध पक्षांच्या महापालिकेतील पदाधिकार्यांनी त्यांच्या सोयीने केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रभाग 31 ची रचना करताना शिवसेनेला अनुकूल असलेला, तसेच प्रभाग 33 मध्ये भाजपला अनुकूल भाग जोडल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, उमेश भेलके, अंकुश तिडके, भाजपकडून वासंती जाधव, हर्षाली माथवड, अजित जगताप, दुष्यंत मोहोळ, मनसेकडून किशोर शिंदे, संजय काळे, सुधीर धावडे प्रमुख इच्छुक आहेत. काँग्रेसकडून राजेंद्र मगर, महेश विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश माथवड, सुनीता मुळीक, संजय वरपे, गिरीश गुरनानी यांची नावे चर्चेत आहेत.
गेल्या निवडणुकीत जुन्या प्रभाग बारामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली होती. महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेलाच येथील जागा मिळतील. मात्र, तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास प्रभाग 31 मध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. शिवसेनेपुढे उमेदवारीसाठी सुतार की मोकाटे हा प्रश्न उभा राहील. मनसेचे शिंदेही येथेच नशीब अजमावतील. महापौर मोहोळ शेवटच्या क्षणी या प्रभागात आल्यास येथील लढत चुरशीची आणि लक्षवेधी ठरेल.
कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे पुतळ्याजवळील नाल्याच्या हद्दीने शिवतीर्थनगरची कमान, तेथून माधवबाग सोसायटी, शिवतीर्थनगर, साकेत सोसायटी, शिक्षकनगर, परमहंसनगर, लोकमान्यनगर, गणेशकृपा सोसायटी, पौड रस्ता, अलंकापुरी सोसायटी, शास्त्रीनगर, गुरुजन सोसायटी, श्रीराम कॉलनी, आझादवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड गावठाण, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, तेजसनगर, गणंजय सोसायटी, मौर्य विहार आणि लगतचा परिसर या प्रभागात समाविष्ट आहे.