Yogi Adityanath : ‘काँग्रेसला बुडवण्यासाठी कुणाची गरज नाही, राहुल-प्रियांका पुरेसे’ | पुढारी

Yogi Adityanath : ‘काँग्रेसला बुडवण्यासाठी कुणाची गरज नाही, राहुल-प्रियांका पुरेसे’

लखनऊ; पुढारी ऑनलाईन :उत्तर प्रदेश राज्यात आज (दि. १४) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. योगींच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षाला हादरवून सोडलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक करत पाठीवर थाप मारली आहे. यावेळी त्यांनी राहुल-प्रियंका यांचा खरपूस समाचारही घेतला.

यूपीच्या ५५ जागांवर मतदान

आज (दि. १४) युपी विधानसभेच्या निवडणूक मतदानाचा दुसरा टप्पा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात मतदान सुरू आहे. यूपीच्या ५५ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. याशिवाय गोवा आणि उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीचा हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.

काँग्रेस पक्षाशी संबंधित एका प्रश्नावर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, काँग्रेसला बुडवण्यासाठी इतर कोणाचीही गरज नाही, हे भाऊ-बहीण (राहुल-प्रियंका गांधी) पुरेसे आहेत. यूपीमध्ये जितक्या शांततेत निवडणुका होत आहेत, तितक्या याआधी कधीच झाल्या नाहीत. आमच्या सरकारने नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेला प्राध्यन्य दिले आहे. आमच्या सरकारच्या कार्यकाळात झालेला विकास विरोकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच ते निरर्थक विधाने करत असल्याचा आरोप योगींनी यावेळी केला.

यूपीमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळेल…

सीएम योगी (Yogi Adityanath) पुढे म्हणाले, आम्ही जे बोललो तेच केले. दुहेरी इंजिनचे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर स्थिती स्पष्ट होत आहे, ज्यानुसार युपीमध्ये भाजपचे पुन्हा बहुमताने सरकार स्थापन होईल. आमच्यासोबत ८० टक्के लोक आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गजवा-ए-हिंदवर योगींनी दिली माहिती…

सीएम योगी यांनी त्यांच्या एका ट्विटशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, हा नवा भारत आहे. हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदींचा भारत आहे. या भारतात सरकार सबका साथ, सबका विकास या भावनेने काम करत आहे. हा नवा भारत शरियतनुसार नव्हे तर राज्यघटनेनुसार चालेल. गझवा-ए-हिंदचे स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही,’ असेही त्यांनी म्हटले.

हिजाबवर प्रतिक्रिया..

हिजाबच्या वादावर बोलताना योगी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘भारताची व्यवस्था राज्यघटनेनुसारच चालली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक श्रद्धा, आमचे हक्क, आमच्या आवडी-निवडी देशावर आणि संस्थांवर लादू शकत नाही. मी यूपीमधील सर्वांना तुम्ही भगवे परिधान करा असा आदेश देऊ शकतो का? वैयक्तिक जीवनात काय परिधान करयाचे हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण शाळांमध्ये ड्रेस कोडच लागू झाला पाहिजे. वैयक्तिक श्रद्धेला आपल्या ठिकाणी आहे, पण जेव्हा संस्थांबाबत चर्चा होते तेव्हा आपल्याला त्यांचे नियम पाळायलाच हवेत.’

कायद्याची धाक पाहिजे…

सीएम योगी म्हणाले की, गुन्हा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी यूपीमध्ये अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही. आता इथे कर्फ्यू लागत नाही. आज यूपीमध्ये कावड यात्रा मोठ्या दिमाखात निघते. श्रद्धेचा मान राखला जातो, असे सांगत त्यांनी आझम खान यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अखिलेश यादव यांनाच आझम खान जेलमधून बाहेर पडू नयेत असे वाटते. कारण खान याच्यामुळे अखिलेश यांची खुर्ची धोक्यात येईल. आझम खान किंवा इतर बाबी ज्या न्यायालयाशी संबंधित आहेत, त्यांना राज्य सरकार जामीन देत नाही. त्या सर्व न्यायालयीन बाबी आहेत. पण विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Back to top button