

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर विमेनच्या (बीएनसीए) चौथ्या वर्षात शिकणार्या चार विद्यार्थिनींना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या एआयएस डिझाईन ऑलिम्पियाड स्पर्धेत एक लाख रुपयांचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. 'शिक्षणप्रक्रियेत जागांच्या रचनेबाबत पुनर्विचार' हा स्पर्धेचा विषय होता. याशिवाय ट्रान्स्परन्स 16.0 स्पर्धेतील वास्तुरचनाशास्त्र विभागात कोविडोत्तर काळात जगणे सुसह्य करण्यासाठी मिश्र वास्तुरचना या विषयातही बीएनसीएच्या दोन माजी विद्यार्थिनींना यश मिळाले आहे.
एआयएस डिझाईन ऑलिम्पियाड स्पर्धेत अनुजा काळे, भाग्यश्री अलाई, दिव्या दहाड आणि माधुरी मालू या चार विद्यार्थिनींच्या गटाने प्रथम पुरस्कार मिळवला, तर ट्रान्स्परन्स 16.0 स्पर्धेतील विजयी माजी विद्यार्थिनींमध्ये तनिशा चैनानी आणि अनिशा काळे यांचा समावेश आहे. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींना प्रा. सायली अंधारे आणि प्रा. माधुरी झिटे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. कश्यप म्हणाले, 'कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरल्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे आता कोविडोत्तर काळात अधिक लवचिक, पर्यावरणस्नेही आणि निसर्गाच्या जवळ जाणारी शिक्षणव्यवस्था असणार्या वास्तूंची गरज आहे, हे लक्षात घेऊनच आमच्या विद्यार्थिनींनी त्यासंबंधीचा आराखडा (डिझाईन) तयार केला.'
प्रा. अंधारे म्हणाल्या, 'कोरोनाच्या प्रसारामुळे जगभरात सर्वत्रच शिक्षण संस्था बंद झाल्या आणि ऑनलाईन शिक्षणाचे भलेबुरे परिणाम विद्यार्थांना भोगावे लागले. या पार्श्वभूमीवर आता नव्याने शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. हे लक्षात घेऊन भारतासारख्या समशीतोष्ण देशातील शिक्षण संस्थांच्या वास्तूंमध्ये वर्गातील विद्यार्थ्यांच्या बैठकीतील बदल, तेथील हवा त्याचप्रमाणे उजेडाला पूरक डिझाईन हे वास्तुरचना शास्त्रापुढे मोठे आव्हान आहे. आमच्या विद्यार्थिनींनी ते यशस्वीरीत्या पेलले.'