Ladies Police : पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी! | पुढारी

Ladies Police : पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांच्या घटत्या संख्येवर संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे. कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील गृह विभागाशी संबंधीत संसदीय स्थायी समितीने एक अहवाल सुपूर्द केला आहे. अहवालातून पोलीस दलात महिलांच्या कमी प्रतिनिधित्वासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (Ladies Police)

समितीकडून गृहमंत्रालयाला सोपविण्यात आलेल्या अहवालातून पोलीस प्रशिक्षण,आधुनिकीकरण तसेच सुधारणांवर भर देण्यात आला असल्याचे कळतेय.पोलीस दलात केवळ १०.३० टक्केच महिला असल्याचा दावा अहवालातून करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

समितीकडून करण्यात आलेल्या शिफारसींनूसार प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी पोलीस दलात महिला पोलीस कर्मचार्यांचे ३३% प्रतिनिधित्वासाठी रोडमॅप बनवण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी अतिरिक्त पदनिर्मिती करावी, असे देखील सूचवण्यात आले आहे.

Ladies Police : पोलीस दलाने संरक्षण दलाकडून बोध घ्यावा

पोलीस दलाने संरक्षण दलाकडून बोध घ्यावा, असा सल्ला देखील अहवालातून देण्यात आला आहे.संरक्षण दल महिलांना आव्हानात्मक कार्य सोपवत आहे. त्यांना युद्धातील भूमिकांची जबाबदारी दिली जात आहे.अशात केंद्रशासित प्रदेश तसेच राज्यांमध्ये देखील पोलीस दलात महिलांच्या भूमिकेसंबंधी विचार केला पाहिजे. त्यांच्यावर आव्हानात्मक कर्तव्यांची जबाबदारी सोपवली पाहिजे, असे अहवालातून सुचवण्यात आले आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तीन महिला पोलीस उपनिरीक्षकासह १० महिला कांस्टेबल तैनात करावे. यासह प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन उभारण्यात यावे, असे देखील सूचित करण्यात आले आहे. राज्य पोलीस दलात २६ लाख २३ हजार २२५ स्वीकृत पदांच्या तुलनेत ५ लाख ३१ हजार ७३७ पदेच भरण्यात आले आहे. ही संख्या २१ टक्क्यांहून कमी असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button