पुणे : जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान

पुणे : जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान
Published on
Updated on

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेचे जलतरण तलाव भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या अनेक ठेकेदारांकडे भाड्याची लाखो रुपयांची थकबाकी आहे. दुसरीकडे हे ठेकेदार तलावाचा ताबा महापालिकेला देत नाहीत, अशी माहिती 'पुढारी'च्या हाती लागली आहे. हे ठेकेदार राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने पालिका प्रशासन नोटिशीचे कागदी घोडे नाचविल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यास 'का कू' करीत असल्याचे समोर आले आहे.

नागरिकांसाठी महापालिकेने 33 जलतरण तलाव आणि 76 क्रीडा संकुले उभारली आहेत. मालमत्ता विभागाच्या ताब्यातील 50 क्रीडा संकुले व जलतरण तलाव सुमारे तीन वर्षांपूर्वी क्रीडा विभागाकडे सोपविण्यात आले. यांच्या निविदा काढून ठेकेदारांना चालवण्यास देण्यात आले आहेत. ठेकेदारांकडून जलतरण तलाव चालविण्याबरोबरच क्रीडा संकुलांमध्ये व्यायाम शाळा, योग केंद्रे आदींची स:शुल्क सुविधाही दिली जाते. ठेकेदारांना शुल्काचे लाखो रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे भाड्याची ठरलेली रक्कम वेळच्या वेळी जमा करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदारांकडून रक्कम वेळेवर जमा केली जात नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. अशा थकबाकीदार ठेकेदारांच्या कराराची मुदत संपल्यानंतरही ते थकबाकीची रक्कमही देत नसल्याचे तसेच मिळकतींचा ताबाही सोडत नसल्याचे 'पुढारी'च्या पाहणीत आढळून आले.

क्रीडा संकुले आणि जलतरण तलावांची थकबाकी न देणार्‍या ठेकेदारांना महापालिकेने नोटिसा बजावण्याची कारवाई केली असली, तरी नोटिसांकडे ठेकेदार ढुंकूनही पाहत नाहीत. महापालिका अधिकारीही मिळकती ताब्यात घेण्याचे पाऊल उचलताना दिसत नाहीत. सामान्य नागरिकांना करवसुलीसाठी धारेवर धरणारे प्रशासन ठेकेदारांवर मेहरबान का, असा प्रश्न निर्माण होतो. हे ठेकेदार राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्यानेच प्रशासनाकडून ही चालढकल होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

न जुमानणार्‍या ठेकेदारांची ही उदाहरणे

'सर्वोदय प्रतिष्ठान'तर्फे शिवाजीनगर येथील स्व. आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव-व्यायामशाळा तसेच विश्रांतवाडी येथील परुळेकर जलतरण तलाव आणि क्रीडासंकुल 2005-06 पासून चालवले जातात. त्यांची आतापर्यंतची एकंदर थकबाकी तब्बल एक कोटी 38 लाख रुपये एवढी आहे. भोसले तलावाच्या ठेक्याची मुदत 2016 मध्येच संपली होती. त्यानंतर तलावाची नव्याने निविदा काढण्याचा प्रस्ताव जुलै 2021 मध्ये क्रीडा विभागाने स्थायी समितीला दिला होता. मात्र, 'स्थायी'नेही हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. स्थायीने हा निर्णयही राजकीय दबावानेच घेतल्याचे स्पष्ट होते. धनकवडी येथील कै. विष्णू जगताप जलतरण तलाव अभिजित गुंजाळ या ठेकेदाराला चालविण्यास दिला होता. या ठेकेदारीच्या निविदेची मुदत 25 जुलै 2021 रोजी संपली. या ठेकेदाराकडे 50 लाखांची थकबाकी आहे, असे असताना ठेकेदाराकडून थकबाकीही भरली जात नाही आणि जलतरण तलावाचा ताबाही सोडला जात नाही.

आयुक्तांचाही निर्णय अद्याप नाही

क्रीडा विभागाने सर्वोदय प्रतिष्ठान या ठेकेदाराला 31 डिसेंबर 2021 रोजी सात दिवसांत ताबा सोडण्यासाठी अंतिम नोटीस दिली, मात्र त्याने ताबा न सोडल्याने थकबाकीच्या वसुलीसाठी त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा प्रस्ताव क्रीडा विभागाने 27 डिसेंबर 2021 रोजी महापालिका आयुक्तांना दिला. आयुक्तांनी त्याबाबतही अद्याप निर्णय दिलेला नाही. या ठेकेदाराने थकबाकी भरण्यासाठी क्रीडा विभागाकडे मुदत मागितली होती, मात्र मुदत देण्याच्या सर्व संधी गमावल्याचे सांगत क्रीडा विभागाने मुदत नाकारली आहे.

दैनिक 'पुढारी'ने टाकला होता प्रकाश

शिवाजीराव भोसले जलतरण परिसरात दारूच्या बाटल्या आणि वापरलेल्या रिकाम्या प्लास्टिक ग्लासचा कचरा जागोजागी पसरल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी तळीरामांच्या दिवस-रात्र पार्ट्या चालतात. शिवाय जलतरण परिसरात हातगाड्या, खासगी वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात उभी असल्याचे वृत्त 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली होती.

महापालिकेच्या जलतरण तलाव व क्रीडा संकुलांच्या ठेकेदारांकडे या मिळकती मालमत्ता विभागाकडे असल्यापासून थकबाक्या आहेत. अनेक ठेकेदार थकबाकी असूनही आणि त्यांची मुदत संपूनही मिळकतींचा ताबा सोडत नाहीत, ही बाब खरी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी ताबा मिळण्यासाठी आम्ही नोटीस देऊन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम तीव्र करण्यात येत आहे.
                                          – संतोष वारुळेकर, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news