PM Modi : घराणेशाही देशाला घातक, विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र | पुढारी

PM Modi : घराणेशाही देशाला घातक, विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेससह इतर पक्षांवर राजकारणात घराणेशाही चालवत असल्याबाबत जोरदार टीका केली. घराणेशाहीचे पक्ष देशाला घातक असून, भाजपने कधीच घराणेशाहीचे राजकारण केले नसल्याचे मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. (PM Modi)

काँग्रेसने देशाच्या राजकारणात घराणेशाहीची विकृती रुजविली. हा तर लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन घराण्यांचे दोन पक्ष आहेत. पंजाबमध्ये एका कुटुंबाचा पक्ष आहे, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडूमध्ये एका कुटुंबाशीच संबंधित पक्ष आहेत. काँग्रेसमध्येही नेतृत्वाचे निकषच एक घराणे आहे. पक्ष किंवा देश हा लोकांचा असतो. तो एका कुटुंबाकडे जातो, तेव्हा त्याचे सार्वजनिक स्वरूपच नष्ट होते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

PM Modi : नकली समाजवाद

सरकारला व्यवसायात रस नाही. गरिबांसाठी घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, गावागावांत रस्ते यालाच माझे प्राधान्य आहे. कुणी याला समाजवाद म्हणत असेल, तर हे मला प्रियच असेल. मी जेव्हा नकली समाजवाद म्हणतो, तेव्हा समाजवादाच्या नावाखाली ती पूर्ण घराणेशाही असते. राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस हे समाजवादी होते.

नितीशकुमार समाजवादी आहेत. त्यांचे कुटुंब बघा, कुठेही दिसत नाही. समाजवादी पार्टीत एका कुटुंबातील 45 लोक कोणत्या ना कोणत्या पदावर होते. 25 वर्षांच्या काळात जवळपास सर्वांनाच निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली. मी यालाच नकली समाजवाद म्हणतो, अशी टीका मोदींनी केली. अखिलेश यादव हे भंपक समाजवादी आहेत. मला आणि अमित शहा यांना उद्देशून ते ‘गुजरात के दो गधे’ असे खालच्या स्तरावर जाऊन बोलत होते. त्यांना लोकांनीच धडा शिकविला. नंतर त्यांनी आत्याबाईंना (मायावती) सोबत घेतले; पण काही उपयोग झाला नाही. आताही तसेच घडेल.

पाचही राज्यांत विजयाचा दावा

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या 12 तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीसह पाचही राज्यांत विजयाचा दावा केला. बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदींनी, देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार अशा अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. भाजपला लोकांनी 2014 मध्ये स्वीकारले, 2019 मध्ये स्वीकारले, काम पाहूनच 2022 मध्येही लोक आम्हालाच स्वीकारतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

ज्या राज्यांतून आम्हाला सेवेची संधी मिळाली, त्या राज्यांनी आमचे काम पाहिलेले आहे. हेच कारण भाजपच्या विजयाबाबतच्या विश्वासामागे आहे, असे मोदी म्हणाले. भाजपच्या जुन्या दिवसांतील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. मोदी म्हणाले की, एकेकाळी अनामत रक्कम वाचली म्हणूनही आम्ही पेढे वाटत असू. आम्ही खूप पराजय पाहिलेले आहेत.

भाषणातून इतका वेळ काँग्रेसवर बोलण्यात का घालवता, या प्रश्नावर मोदी म्हणाले की, देशातील आजच्या परिस्थितीमागे काँग्रेसचीच धोरणे कारणीभूत आहेत. मी आणि अटलबिहारी वाजपेयी सोडले तर सगळेच पंतप्रधान काँग्रेसचे वा त्याच विचारसरणीचेच झालेले आहेत. काँग्रेसने राजकारणात कसा चेहरा असावा, त्याचे मानदंड अत्यंत खोलवर रुजवले आहेत. हे मानदंड देशासाठी घातक आहेत. काँग्रेसने योग्य पद्धतीने काम केले असते, तर देश आज खूप पुढे असता.

जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान होते. मी त्यांच्याबद्दल खोटेनाटे काहीही सांगितलेले नाही. त्यांच्या पर्यायाने काँग्रेसच्या ध्येयधोरणांनी जोे काही फटका देशाला बसला, त्यावर बोट ठेवण्यात गैर काय आहे, असे मोदी म्हणाले.

(PM Modi) पक्ष बुडाला तरी चालेल; पण कुटुंब टिकले पाहिजे!

पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर यावेळी सडकून टीका केली. ते म्हणाले, घराणेशाहीचे पक्ष देशाला घातक आहेत. काही लोक कोणाचेच ऐकत नसून ते थेट संसदेतून निघून जातात. मी आतापर्यंत कधीच कोणाच्या आजोबा अथवा वडिलांविरोधात बोललो नाही. पक्ष बुडाला तरी चालेल; पण एक कुटुंब टिकले पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकाधिकारशाहीवर देश चालत नसल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले.

हिराणींच्या चित्रपटात शाहरूखसोबत विकी

Back to top button