पैशासाठी चक्क आईनेच विकला पोटचा गोळा!; मुलगा हरवल्याचा केला बनाव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पैशासाठी एका आईनेच पोटचा गोळा असलेल्या आपल्या मुलाला एक लाख रुपयांत विकून तो बेपत्ता झाल्याची तक्रार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. तिने ज्या दलालाला मुलाला विकले त्या दलालाने पुढे एक लाख 60 हजार रुपयांना हे मूल विकल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी पोलिसांची नऊ पथके तयार करून मुलाच्या आईसह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नील गणेश पवार (वय 4 ) असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून मुलाची आई प्रियंका गणेश पवार (वय 24), जन्नत बशीर शेख (55, तिघेही रा. लोकमान्य कॉलनी, जळकी वस्ती, कोथरूड), रेश्मा सुतार (53, कोथरूड), भानुदास रामदास माळी (48), चंद्रकला भानुदास माळी (42, दोघेही रा. बोरलेगाव, ता. पनवेल, जि. रायगड), दीपक तुकाराम म्हात्रे (49), सीताबाई दीपक म्हात्रे (41, दोघेही रा. केळवणे, ता. पनवेल, जि. रायगड), तुकाराम भिवा निंबळे (62, रा. मु. पो. वारू, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कोथरूड परिसरातील जळकी वस्ती परिसरात प्रियंका पवार ही तिच्या दोन मुलांसह राहते. पतीपासून विभक्त झाल्याने दोन महिन्यांपूर्वी ती पर्वती येथील सासरवरून कोथरूड येथे माहेरी राहण्यास आली. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तिने कोथरूड पोलिस ठाण्यात चार वर्षांचा तिचा मुलगा दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड, वारजे, उत्तमनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांची नऊ तपास पथके तयार करण्यात आली.

बांगडीवाली भाभीकडून उलगडला प्रकार

या गुन्ह्यातील पळवून नेलेला पीडित मुलगा दुपारच्या वेळी त्याच परिसरात राहणार्‍या बांगडीवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बांगडीवाली भाभी जन्नत शेख हिला ताब्यात घेऊन तपास केला; परंतु तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी पोलिस नाईक आकाश वाल्मिकी व विशाल चौगुले यांना सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान बांगडीवाली भाभी मुलाला घेऊन जाताना दिसून आली. त्यामुळे जन्नत शेख हिला पोलिसी खाक्या दाखवून तिच्याकडे तपास केला असता तिने आरोपी बशीर शेख, स्थानिक महिला रेश्मा सुतार व मुलाची आई प्रियंका पवार यांच्याशी संगनमत व कट रचून मुलगा मध्यस्थ तुकाराम निंबळे याच्यामार्फत पनवेल येथील चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला असल्याचे सांगितले.

दलालांनीही केली त्याच मुलाची विक्री

दरम्यान, पथकांना भानुदास माळी हा पनवेल येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे तपास पथके रवाना झाली. त्यानंतर तत्काळ पनवेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क साधून चंद्रकला आणि भानुदास माळी यांच्याकडे तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडूनही धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी चार वर्षांच्या नीलला पनवेल येथील केळवणेमधील दीपक तुकाराम म्हात्रे व सीताबाई म्हात्रे यांना 1 लाख 60 हजारांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पालंदे यांनी अपहरण झालेल्या मुलाला म्हात्रे दाम्पत्याकडून ताब्यात घेऊन मुलाला सुखरूप त्याच्या वडिलांकडे सोपविले. सदरची कामगिरी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, शंकर खटके, सुनील जैतापूरकर, सहायक पोलिस निरीक्षक आरती खेतमाळीस यांच्याकडील नऊ पथकांनी केली.

एखाद्या महिलेच्या पोटचा गोळा हरविल्यानंतर आईच्या तोंडातून शब्द फुटत नाही; परंतु, या घटनेत पोलिस ठाण्यात आलेल्या त्या आईच्या चेहर्‍यावर पाहिजे तितकी गंभीरता दिसत नाही. तेथेच आमच्या मनात तिच्याविषयी संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात आम्हाला बनाव उघड करण्यात यश आले.
– महेंद्र जगताप, वरिष्ठ निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे.

तस्करीसाठी विवाह जुळविले का?

गुन्ह्यात अटक करण्यात आलेला भानुदास माळी आणि तुकाराम निंबळे हे दोघेही विवाह जुळविण्याचे काम करतात. यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कोणाला मुलाची विक्री केली आहे का किंवा त्यांनी विवाह जुळविण्याचे काम करून नंतर मूल झाल्यावर त्यांची तस्करी केली आहे का, असाही तपास सुरू आहे.

महिनाभरात अपहरणाची तिसरी घटना

महिनाभरापूर्वी चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डुगूचे झालेले अपहरण, त्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुलाचे अपहरण आणि आता कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आईने मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news