Tripura politics : त्रिपुरात भाजपला जोरदार झटका! दोन आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, बिप्लब देब सरकार अडचणीत?

Tripura politics : त्रिपुरात भाजपला जोरदार झटका! दोन आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, बिप्लब देब सरकार अडचणीत?

अगरताळा; पुढारी ऑनलाईन

Tripura politics : त्रिपुरात भाजपला जोरदार झटका बसला आहे. त्रिपुरा विधानसभेतील भाजपचे बंडखोर आमदार सुदीप रॉय बर्मन (BJP MLA Sudip Roy Barman) आणि आशिष कुमार साहा (Ashish Kumar Saha) यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसचा हात हातात घेतलाय. दरम्यान, भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणारे सुदीप रॉय बर्मन आणि आशिष कुमार यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि दोघांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

"अनेक आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी तयार आहेत. पण कदाचित तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आणखी काही महिने वाट पहावी लागेल. पक्षात सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. मला वाटते की गुजरात आणि हिमाचलसह त्रिपुरामध्ये निवडणूक होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सुदीप रॉय बर्मन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दिली आहे.

याआधी भाजपचे बंडखोर आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी त्रिपुरा सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्यात लोकशाही नाही आणि येथे लोकांची घुसमट होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजप सोडल्याच्या प्रश्नावर त्यांनी म्हटले होते की, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपण हा निर्णय घेतला आहे.

त्रिपुरात २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधीच भाजपला धक्का (Tripura politics) बसला आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सुदीप रॉय त्रिपुरा सरकारमध्ये मंत्री होते. पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले होते. राज्यात लोकशाही कुठेच दिसत नाही. कारण लोकशाहीचा ऑक्सिजन कमी झाला आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता.

२०१७ मध्ये सुदीप रॉय बर्मन तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. जून २०१९ मध्ये त्यांना आरोग्य मंत्री पदावरुन हटविण्यात आले होते. भाजपच्य़ा दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने ६० सदस्यीय त्रिपुरा विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या ३३ झाली आहे. दरम्यान, भाजपने बिप्लब देब (Biplab Kumar Deb) यांच्या सरकारला धोका असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news