बारामती तालुका पोलिस ठाण्याला बेस्ट डिटेक्शन अवार्ड | पुढारी

बारामती तालुका पोलिस ठाण्याला बेस्ट डिटेक्शन अवार्ड

बारामती, पुढारी वृत्तसेवा :  शिर्सूफळ (ता. बारामती) येथील प्रसिद्ध शिरसाई मंदिरातील १२ लाख रुपयांच्या चोरीचा अवघ्या २४ तासात छडा लावणाऱ्या बारामती तालुका पोलिस ठाण्याला बेस्ट डिटेक्शन पुरस्काराने जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडून सन्मान करण्यात आला. तालुका पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून राज्यातील १४ मंदिरातील चोऱ्यांचे प्रकार उघडकिस आले होते.

पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सपोनि योगेश लंगुटे, हवालदार रमेश भोसले, अंमलदार नंदू जाधव, राहूल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजित मुळीक, अमोल नरुटे, बापूराव गावडे यांनी ही कामगिरी केली होती. प्रातिनिधिक स्वरुपात पोलिस अधिक्षकांकडून दोघा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

शिर्सूफळच्या शिरसाई मंदिरात ८ जानेवारी २०२२ रोजी रात्री एक ते तीनच्या दरम्यान चोरी झाली होती. देवीच्या अंगावरील दागिने व इतर वस्तू असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण व पथकाने अवघ्या २४ तासात आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ शिरगाव येथून अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास अत्यंत क्लिष्ट होता.

गुन्ह्यात वापरलेली मोटारसुद्धा चोरीची होती. त्यामुळे तिच्या क्रमांकावरूनही चोरांचा माग काढणे अशक्य झाले होते. शिवाय चोरट्यांनी केलेल्या प्रवासात सीसीटीव्हीत ते कैद झालेले असले तरी त्याचे फुटेजसुद्धा अत्यंत खराब होते. परिणामी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. एकीकडे देवीच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याने प्रक्षुब्ध झालेले ग्रामस्थ आणि दुसरीकडे गुन्हा उघडकिस आणण्याचे आव्हान या दोन्ही पातळ्यांवर तालुका पोलिसांची कसोटी लागली होती. परंतु ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाला जागत अवघ्या २४ तासात आरोपींना जेरबंद करण्याचे काम तालुका पोलिसांनी केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी शाहरूख राजू पठाण (वय २४, रा. गोकूळ शिरगाव, कोल्हापूर, मूळ रा. तक्रारवाडी, निरा, ता. पुरंदर), त्याची पत्नी पूजा जयदेव मदनाळ व मेहुणी अनिता गोविंद गजाकोश यांना अटक केली होती. त्यांच्याकडून राज्यातील मंदिरातील १४ ठिकाणच्या चोऱ्या उघडकिस आल्या. या गुन्ह्याची कौशल्यपूर्णरित्या उकल केल्याबद्दल पोलिस अधिक्षकांकडून हा सन्मान करण्यात आला.

हे ही वाचलं का  

Back to top button