सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजित डिसले यांना अधिकार नसताना सहा महिन्यांची रजा देण्याचे आदेश दिले. त्यांच्या या नियमबाह्य कामकाजाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जि. प. सदस्य प्रा. सुभाष माने यांनी दिली.
अमेरिका येथील शिष्यवृत्तीसाठी डिसले गुरुजी यांना सहा महिन्यांची रजा आवश्यक होती. मात्र जि. प. शिक्षण विभागाकडून पैशांची मागण करण्यात येत आहे. रजा मंजूर करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप रणजित डिसले गुरुजी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता.
ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षकाची कोठेतरी प्रशासकीय यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याची भावना यामुळे समाजमानसात निर्माण झाली होती. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सुट्टीचा दिवस असतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना मोबाईलवर संवाद साधून डिसले गुरुजी यांना रजा मंजूर करण्याचे आदेश दिले होते.
शिक्षणमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार तातडीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी डिसले गुरुजी यांना सहा महिन्यांची रजा मंजूरही केली. मात्र यानंतर यांच्याविरोधात जि. प. सदस्यांनी भूमिका घेत डिसले गुरुजी चुकीचे वागत असल्याचे सांगत आहेत.
डिसले गुरुजी हे ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत सेवेत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेच्या संदर्भात सर्व अधिकार राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे आहेत. असे असताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी बेकायदेशीर हस्तक्षेप करुन प्रशासकीय अधिकार्यांवर दवाव आणून डिसले गुरुजी यांना रजा मंजूर केला असल्याचा आरोप जि. प. सदस्य प्रा.माने यांनी केला आहे.
डिसले गुरुजी यांना मंजूर करण्यात आलेली रजा रद्द करण्यात यावी. अन्यथा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशीही माहिती प्रा. माने यांनी जि.प. सीईओ दिलीप स्वामी यांना लेखी दिली आहे.
हे ही वाचलं का