बारामती : शेतकऱ्याची कर्ज परतफेड रक्कम सचिवाने केली हडप | पुढारी

बारामती : शेतकऱ्याची कर्ज परतफेड रक्कम सचिवाने केली हडप

बारामती, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्याने घेतलेल्या मध्यम मुदत व पिक कर्जाच्या रकमेपोटी भरण्यासाठी दिलेले ४ लाख १५ हजार रुपये परस्पर खर्च करत त्याला सोसायटीचा बाकी नसल्याचा खोटा दाखला दिला. शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा हा प्रकार उंडवडी सुपे, ता. बारामती येथे घडला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत बाबासो जगताप (रा. उंडवडी) या शेतकऱ्याने याबाबत फिर्याद दिली.

भरत जगताप यांनी सन २००३ मध्ये उंडवडी सुपे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत पुणे जिल्हा बॅकेकडून मध्यम मुदत व पिक कर्जापोटी पैसे घेतले होते. त्याचे हप्ते त्‍यांनी वेळोवेळी बॅंकेत जमा करत हाेते. परंतु काही घरगुती अडचण आल्याने ते हप्ते भरू शकले नाहीत. त्यामुळे मुद्दल व व्याज असे एकूण ६ लाख रुपयांचे देणे त्यांना झाले. सोसायटीशी तडजोड करत त्यांना ४ लाख १५ हजार रुपयांची रक्कम भरण्यास सांगण्यात आले.

दरम्‍यान, तेथील सचिव म्‍हणाले हे पैसे माझ्याकडे द्या, मी सोसायटीमध्ये भरतो व कर्ज बाकी नसल्याचा दाखला देतो असे सांगितले. त्यामुळे जगताप यांनी ही रक्कम त्यांच्याकडे दिली. त्यानुसार कर्ज बाकी नसल्याचा दाखला सचिवाने दिला. परंतु आॅगस्ट २०२१ मध्ये जगताप हे जिल्हा बॅंकेच्या शाखेत गेले असता त्यांच्या कर्ज खात्यात सोसायटीकडून कोणतीही रक्कम भरली गेली नसल्याचे सांगण्यात आले.

तसेच फिर्यादीच्या गट नंबर १३१ च्या सात बारा उताऱ्यावरील कर्जाची रक्कमही उतरली नव्हती. त्यामुळे त्यांनी सचिवाची  भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्‍यांना टाळाटाळ केली. एकदा जगताप यांनी  सचिवाला गाठत जाब विचारला असता त्यांनी माझी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हे पैसे मी पुढे जमा न करता संस्थेचा शिक्का मारून खोटा दाखला दिल्याचे सांगितले.

तसेच, या रकमेपोटी फिर्यादीला बॅंक ऑफ महाराष्ट्र, बारामती शाखेचा २ लाख ७ हजार व २ लाख ८ हजारांचे चेक दिले. हे चेक फिर्यादीने ४ सप्टेंबर व १५ सप्टेंबर २०२१ रोजी खात्यावर भरले. परंतु ते वठले नाहीत. त्यानंतर पुन्हा सचिवाकडे विचारणा केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

हे ही वाचलं का 

Back to top button