व्हिडिओ : बारामुलातील मोठ्या बर्फवृष्टीत कोरोना लसीकरण, हेल्थ आर्मीला सॅल्यूट! | पुढारी

व्हिडिओ : बारामुलातील मोठ्या बर्फवृष्टीत कोरोना लसीकरण, हेल्थ आर्मीला सॅल्यूट!

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन

जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टी सुरु आहे. बारामुलामध्ये (Baramulla) मोठ्या बर्फवृष्टीतही (heavy snowfall) आरोग्य विभागाच्या टीमने एलओसी जवळील गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम सुरुच ठेवली आहे. याचा एक व्हिडिओ (VIDEO) समोर आला असून त्यात काश्मीरमधील अत्यंत प्रतिकूल हवामानात आरोग्य विभागाची टीम लसीकरणासाठी बर्फातून मार्गक्रमण करताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी बारामुलामधील एएनआय वृत्तसंस्थेचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ‘कितीही अडचणी येऊ देत लक्ष्य साधण्यासाठी निघालो आम्ही, देश आम्ही सुरक्षित आणि निरोगी बनवणार’, असे संदेश देत बारामुलामधील भीषण बर्फवृष्टीत भारतीय आर्मीच्या मदतीने आमची हेल्थ आर्मी लसीकरण मोहिमेची जबाबदारी पार पडत असल्याचे डॉ. मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यात सध्या हाडे गोठवणारी थंडी आहे. येथील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. तरीही अशा परिस्थितीत लसीकरण मोहीम सुरु आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी कोरोनाचे ६,२५३ नवे रुग्ण आढळून आले होते. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या येथे ४२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या शनिवारी येथे रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. शनिवारी येथे ६,५६८ रुग्ण आढळून आले होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात रोज सुमारे ५,७०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ६ हजार ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ हजार ४६९ ने कमी आहे. देशात सध्या कोरोनाचे २२ लाख ४९ हजार ३३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ४३ हजार ४९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २०.७५ टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ७१.६९ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत १४ लाख ७४ हजार ७५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर रिकव्हरी रेट ९३.०७ टक्क्यांवर घसरला आहे.

Back to top button