पुणे : 1 हजार 283 कोटींचे मिळकत करातून उत्पन्न

पुणे : 1 हजार 283 कोटींचे मिळकत करातून उत्पन्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला मिळकत करातून चालू आर्थिक वर्षात 2 ऑगस्ट रोजी रात्री 8 पर्यंत 1 हजार 283 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत 136 कोटी जास्त असल्याचा दावा महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केला आहे. महापालिका हद्दीतील मिळकतींना मिळकतकर विभागाकडून कर आकारणी केली जाते.

या मिळकतींचा कर 1 एप्रिल ते 31 मे या दरम्यान भरणार्‍यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम 25 हजारांपेक्षा कमी आहे. अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये 10 टक्के सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम 25 हजार 1 रुपयांपेक्षा जास्त असणार्‍या मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये 5 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे.

यंदा मात्र, मिळकत करातील 40 टक्के सवलतीच्या निर्णय प्रलंबामुळे महापालिकेने मिळकत करातील सवलतीसाठी 15 मे ते 31 जुलै हा कालावधी निश्चित केला होता. मात्र, 31 जुलै रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे सवलतीसाठी दोन दिवस मुदतवाढ देऊन ती 2 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली.

या कालावधीत 2 ऑगस्ट रोजी रात्री 8 पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 283 कोटी 56 लाखांचे उत्पन्न जमा झाले. हे उत्पन्न गतवर्षी 1 हजार 145 कोटी होते. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा हे उत्पन्न तब्ब्ल 136 कोटींनी जास्त असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news