‘या’ गावात प्राण्यांनाही असते साप्ताहिक सुट्टी! | पुढारी

‘या’ गावात प्राण्यांनाही असते साप्ताहिक सुट्टी!

रांची : आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस विश्रांती घेणे आवश्यकच ठरते. तन-मनाला विश्रांती मिळाली की माणूस ताजातवाना होऊन नव्या ऊर्जेने काम करू शकतो. नोकरी-व्यवसाय करणारे अनेक लोक त्यासाठीच साप्ताहिक सुट्टी घेत असतात. अगदी शाळा-कॉलेजलाही रविवारी सुट्टी असते. मात्र, चक्क प्राण्यांनाही अशी साप्ताहिक सुट्टी कुठे मिळत असेल याची आपण कल्पना करणार नाही. आपल्याच देशात एक गाव असे आहे जिथे प्राण्यांना अशी सुट्टी दिली जाते.

झारखंड राज्यात लातेहार नावाचे हे गाव आहे. या गावात आठवड्यातून एकदा बैलांसारख्या कष्ट करणार्‍या प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपराच आहे. अर्थात ही परंपरा फार प्राचीन काळापासून आहे असे नाही. शंभर वर्षांपूर्वी या गावात शेतात काम करताना एका बैलाचा अतिकष्टाने थकून मृत्यू झाला. त्यावेळेपासून गावातील लोकांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एक दिवस पूर्ण विश्रांती देण्याचे ठरवले. ही परंपरा आजपर्यंत कसोशीने पाळली जाते. लातेहारमध्ये ही परंपरा सुरू झाली आणि ती पुढे जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही पाळली जाऊ लागली. याठिकाणी बैल व अन्य जनावरांना रविवारी पूर्ण विश्रांती दिली जाते. त्यांच्याकडून कोणतेही कष्टाचे काम यादिवशी करवून घेतले जात नाही.

Back to top button