

बारामती : पुढारी वृत्तसेवा : प्रचंड उन्हाने आणि उकाड्याने जनता हैराण झाली असतानाच बारामती शहर आणि परिसरात लावण्यात आलेल्या लाखो झाडांमुळे बारामतीकरांना ऐन उन्हाळ्यात शीतल छाया मिळत आहे. पालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी आणि नगरसेवकांनी गेल्या काही वर्षात बारामतीत जोपासलेल्या झाडांमुळे ऐन उन्हाळ्यातही बारामती हिरवीगार पाहायला मिळत आहे.
नगरसेवक जय पाटील यांच्या पुढाकाराने तांदूळवाडी परिसरात मोठे वृक्षारोपण झाले. सन 2015 मध्ये गुरुकृपा कॉलनी ते तलाठी कार्यालय, तांदुळवाडी गावठाण या अडीच किलोमीटर अंतरावर सुमारे 4 हजार झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास सर्वच झाडे आज दिमाखात उभी असून ये-जा करणार्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या झाडांना वेळेवर पाणी देत असल्याने आणि स्वच्छता राखत असल्याने या परिसरात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. बारामतीचा विस्तार वाढल्यानंतर शहराजवळ असलेली तांदुळवाडी, रुई आणि जळोची ही गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. रस्ते, सर्व प्राथमिक सुविधा, झाडे लावण्याकडे पालिकेने वेळोवेळी पुढाकार घेतल्याने हजारो झाडे आज या भागातील नागरिकांना आपलेसे करत आहेत.
वड, चिंच, गुलमोहर, शिसर, अर्जुन, लिंब आदी प्रकारची झाडे या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आली आहेत. भिगवण रस्ता (सम्यक चौक) ते देशमुख चौकापर्यंत सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. या भागासह शहराच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले आहे. त्यामुळे बारामतीकरांना हा उन्हाळा आल्हाददायक गेला. कसबा परिसर, महावीर पथ या भागातही स्थानिक वृक्षप्रेमींनी मोलाची मदत केल्याने या भागातही हिरवाई बहरली आहे.