

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय गाड्यांचे पासिंग (फिटनेस तपासणी) वेळेत होणार का, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक आणि स्कूल व्हॅनमधील कोंबाकोंबी थांबणार का, मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन होणार का, यासोबतच आरटीओची तपासणी आणि कारवाईत सातत्य राहणार का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. नियमांचे पालन झाले नाही तर शालेय मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होणार आहे.
येत्या 13 तारखेपासून शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे मुलांची शालेय वाहतूक करणार्या वाहनांची योग्य तपासणी होणे, गरजेचे आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून दरवर्षी म्हणावे तितके गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी दुर्घटना घडली तरच प्रशासन खडबडून जागे होते. त्यानंतर कालांतराने जैसे थेच परिस्थिती ! दुर्घटना व्हायला नको याकडे प्रशासनाने आणि अधिकार्यांनी सातत्याने लक्ष देऊन मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शाळा सुरू झाल्यावर काही खासगी स्कूल व्हॅन अनधिकृतपणे विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. मात्र, प्रादेशिक परिवहन विभाग याकडे कायमच दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बस, स्कूल व्हॅनला काही अटी, शर्तींची पूर्तता करून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काही खासगी व्हॅन विनापरवाना स्कूल व्हॅनमार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना पाहायला मिळतात. खासगी स्कूल व्हॅनचा रंग पिवळा नसतो, त्यांच्याकडे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतो. असे असतानाही आरटीओ याकडे काणाडोळा करत असल्याचे दरवर्षी दिसते.
शहरात शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या वाहतूक जोमात सुरू असते. त्यातच भर म्हणजे स्कूल व्हॅनचालक आसन क्षमतेपेक्षा अधिक मुले आपल्या स्कूल व्हॅनमध्ये कोंबतात. नियमानुसार 7 लहान मुलांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, एका व्हॅनमध्ये 15 ते 20 मुलांची वाहतूक करण्यात येत असल्याचे अनेकदा दिसते.
पीएमपी प्रशासनाकडून शालेय वाहतुकीसाठी आपल्या ताफ्यातील बस वापरण्यात येत असतात. शालेय वाहतुकीचा पीएमपीने वेगळा परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र, पीएमपीकडून नियम धाब्यावर बसवत गेल्या 35 ते 36 वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक सुरू आहे. याकडे आरटीओ प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.
शालेय वाहतूकदारांनी मुलांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन सर्व नियमांचे पालन करावे. आरटीओकडून स्कूल व्हॅन पासिंग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे स्कूल व्हॅन चालकांनी आपली वाहने तातडीने पासिंग करून घ्यावीत. शालेय वाहनांच्या पासिंगला प्राधान्य देण्यात येईल.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे