

Pradnya Satav Join BJP Assets Education: हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या निर्णयामुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज सकाळी त्यांनी विधिमंडळ सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
पक्ष सोडण्याबद्दल बोलताना प्रज्ञा सातव यांनी आपली भूमिका मांडली. “हिंगोलीच्या विकासासाठी राजीव सातव यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पक्षप्रवेश केला आहे,” असं त्या म्हणाल्या. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास’ या तत्वांनुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. राजीव सातव यांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची ताकद आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला.
हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली गटबाजी, नेत्यांमधील संघर्ष आणि सलग निवडणुकांतील अपयशामुळे काँग्रेसची पकड हळूहळू सैल होत गेली, असं चित्र दिसून आलं आहे.
दिवंगत खासदार राजीव सातव यांना खासदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्यात राजीव सातव गट आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. या अंतर्गत वादाचा मोठा फटका पक्षाला बसला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षांत प्रवेश केल्याचंही पाहायला मिळालं.
प्रज्ञा सातव या विधानपरिषदेवर निवडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला आहे. त्यांचं वय 48 असून, त्या शेती आणि पेट्रोलियम व्यवसायात काम करत आहेत.
त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार,
एकूण संपत्ती: सुमारे 19 कोटी 74 लाख रुपये
कर्ज: सुमारे 64 लाख रुपये
शिक्षण: एमबीबीएस (MBBS)
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला मोठा राजकीय फायदा होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. आता सर्वांचे लक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागलं आहे.