

पुणे: महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र येण्याबाबत महत्त्वाची पावले पडली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासच्या वरिष्ठ नेत्यांची आघाडीबाबत मंगळवारी रात्री चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पुण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मते जाणून घेणार आहेत.
विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप समवेत जाण्याच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये फूट पडली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र येण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती.
त्यातच महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शविला असला तरी पिपंरी-चिंचवड शहराध्यक्षांनी मात्र आघाडी व्हावी अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र आघाडीसाठी पाऊल टाकले आहे. अजित पवार यांच्या समवेत जाण्याबाबत स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे.
मंगळवारी रात्री दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यातच उपमुख्यमंत्री पवार यांनी आज गुरुवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग््रेासच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहेत. त्यातही आघाडीबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शुक्रवारी पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी समवेत जाण्याबाबत मते जाणून घेणार आहे.
एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास पुन्हा एकत्र येण्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी सुरू असून, पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होईल, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.