

विक्रमगड : आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत भात खरेदी केंद्रांद्वारे शेतकऱ्यांचा भात खरेदी करून त्यांना हमीभाव दिला जातो. मात्र जानेवारी महिना उजाडूनही विक्रमगड तालुक्यात मंजूर झालेल्या एकाही भात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विक्रमगड तालुक्यात दादडे, साखरे, चिंचघर, आलोंडा, बास्ते व सवादे या सहा ठिकाणी आधारभूत भात खरेदी केंद्रांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर सुमारे 7 हजार शेतकऱ्यांचा जवळपास 60 हजार क्विंटल भात खरेदी होणे अपेक्षित आहे. मात्र मंजुरी मिळूनही अद्याप एकाही केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी भाताचा हमीभाव प्रति क्विंटल 2,300 रुपये होता, तो यावर्षी वाढवून 2,369 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. असे असतानाही केवळ मोजक्या शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली असून हजारो शेतकरी अजूनही नोंदणी प्रक्रियेत अडकले आहेत.
खरेदी लवकर सुरू होईल, असा विश्वास केंद्रप्रमुख पी. के. मुंडे यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात अद्याप खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. कोकणात सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने निसर्गावर अवलंबून असलेले भात हे प्रमुख व एकमेव पीक आहे. तालुक्यातील सुमारे 80 टक्के शेतकरी भात उत्पादनावरच वर्षभराची उपजीविका करतात. वाढती मजुरी, बियाणे, खते व शेती अवजाऱ्यांच्या किमती यामुळे आधीच भात उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत शासकीय स्तरावरून भात खरेदीला होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांसाठी अधिकच चिंताजनक ठरत आहे.
योग्य बाजारपेठेअभावी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने भात विकावा लागत असून त्यातून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे तातडीने भात खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
अद्याप तालुक्यात कोठेही भात खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना भात विकावा लागत आहे. मंजूर केंद्रांवर त्वरित खरेदी सुरू करावी.
रणधीर पाटील, शेतकरी, ओंदे गाव
येत्या दोन दिवसांत मंजूर केंद्रांवर भात खरेदी प्रत्यक्षात सुरू केली जाईल.
योगेश पाटील, अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, जव्हार