

अंबरनाथ : युतीची बोलणी सुरू असतानाही भाजपाने काँग्रेससोबत गाठ बांधून अभद्र युती केल्याची टीका शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. असे असले तरी व्यक्ती द्वेषामुळेच ही युती होऊ शकली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस सोबत भाजपा ने हात मिळवल्याने सर्वात जास्त नगरसेवक निवडून येऊन देखील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
मागील 30 वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला प्रथमच यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. असे असले तरी शिवसेनेचे सर्वात जास्त 27 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे शिवसेना व भाजपा युती होईल. असे संकेत असताना व युतीची बोलणी सुरू असताना केवळ व्यक्ती द्वेषामुळे ही युती होऊ शकली नाही व भाजपाने काँग्रेस व राष्ट्रवादी (अप गट) यांना सोबत घेऊन भाजपाने आपली विकास आघाडी तयार केली आहे. यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे.
शिवसेना-युती करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुणवंत खेरोडिया यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती होणार हे निश्चित मानले जात असतानाच, भाजपाने काँग्रेस सोबत हात मिळून सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे भाजपाने अभद्र युती केल्याची टीका आमदार डॉ. किणीकर यांनी केली आहे. येत्या 12 जानेवारी रोजी आयोजित सभेमध्ये सत्तेची समीकरणे समोर येणार आहेत.
अंबरनाथमध्ये वाळेकर आणि करंजुले हे दोघे एकमेकांच्या विरोधात नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढून तेजश्री करंजुले विजयी झाल्या. या निवडणुकीत दोघांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यामुळे निवडून आल्यावर करंजुले यांनी वाळेकर यांना दूर ठेवताना शिवसेनेशी युती देखील नाकारली असल्याचे बोलले जात आहे.