

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात तेथील निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्वशिला शिंदे यांची भूमिका संशयास्पद आहे. तरीही ह्या अधिकारी मोकाट असल्याने मंगळवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, ठामपा आयुक्त मुख्य निवडणुक अधिकारी सौरव राव यांची भेट घेतली.
तसेच, उमेदवारी अर्जामध्ये घोळ घालणाऱ्या या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर 24 तासात कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यावर आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी लवकरच माहितीच्या अधिकारातून या वादग्रस्त अधिकारींचा पर्दाफाश करण्याचा निर्धार बोलुन दाखविला.
सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत पक्षपाती भूमिका घेऊन पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधील मनसेसह अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे निवडणुक कपटनितीने बाद करणाऱ्या वृषाली पाटील आणि प्रभाग 5 मधील वादग्रस्त अधिकारी सत्वशिला शिंदे या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसे आक्रमक बनली आहे.
उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आल्याचे चित्रिकरण देखील अविनाश जाधव यांनी जाहिरपणे प्रदर्शित केले होते. तसेच या बिनविरोध प्रक्रियेतील घोळाची सविस्तर तक्रार मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणुक आयुक्तांकडे तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्यापपावेतो ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. तेव्हा, बिनविरोध निवडणुकीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला तर, पुढच्या खेपेला महापौर देखील बिनविरोध बसेल. अशी भिती व्यक्त करून अविनाश जाधव यांनी मंगळवारी या निषेधार्थ, आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तर, मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले आहे, मात्र कारवाई न झाल्यास 25 व्या तासाला पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
भाजप-शिवसेना महायुतीने मंगळवारी जाहिर केलेल्या वचननाम्याची मनसे नेते अविनाश जाधव यांनी खिल्ली उडवली. भाजप महायुतीने त्यांच्या वचननाम्यामध्ये लिहून द्यावे की, 50 लाख अपक्षाला, 2 कोटी शिवसेनेच्या उमेदवाराला, 3 कोटी मनसेच्या उमेदवाराला, 50 लाख काँग्रेसच्या उमेदवाराला असे रेटकार्ड मांडावे. तसेच पुढील निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये कुठल्या उमेदवाराला किती पैसे दिले. हे देखील वचननाम्यामध्ये आले तर पक्ष प्रगतशील भारतीय जनता पार्टी होईल. असा टोलाही अविनाश जाधव यांनी लगावला.