

कोप्रोली-उरण : जेएनपीएच्या चौथ्या बंदराच्या विस्तारासाठी 200 हेक्टर क्षेत्रावर दगड मातीचा भराव केला आहे. मात्र भरावाच्या कामामुळे मासेमारी केली जाणाऱ्या 15 हेक्टर क्षेत्रावर चिखलाचे डोंगर निर्माण झाले आहेत.
या क्षेत्रावर आता मोठ्या प्रमाणावर खारफुटीची झाडे उगवल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी खाजण क्षेत्र कमी झाले आहे. येथील पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांनी खाजण क्षेत्रावरील चिखलाचे डोंगर काढून टाकण्याची मागणी केली असली तरी या क्षेत्रावर आता मोठ्या प्रमाणावर उगवलेली खारफुटीची झाडे काढून टाकणे अशक्य होऊन बसल्याने जेएनपीए अडचणीत आली आहे.
जेएनपीएने 11 हजार 284 कोटी रुपये खर्चून चौथ्या बंदराचा विस्तार केला आहे. हे चौथे बंदर देशातील सर्वात मोठ्या लांबीचे ठरले आहे. मात्र या बंदराच्या विस्ताराच्या कामाचा सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावर दगड-मातीचा भराव टाकण्यात आला आहे. आता चौथ्या बंदराच्या विस्तारकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. यामुळे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. मात्र चौथ्या बंदराच्या विस्ताराच्या कामादरम्यान या करण्यात आलेल्या भरावाच्या कामामुळे 200 हेक्टर भराव क्षेत्रापैकी 15 हेक्टर क्षेत्रावर चिखलाचे डोंगर निर्माण झाले आहेत.
याआधीच जेएनपीएच्या विविध प्रकल्पांसाठी केलेल्या माती-दगडाच्या प्रचंड भरावांमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी खाजण क्षेत्र कमी झाले आहे. त्यामध्ये आता नव्याने 15 हेक्टर खाजण क्षेत्राची भर पडली आहे. त्यामुळे 15 हेक्टर खाजण क्षेत्रावरील चिखलाचे डोंगरांचे सपाटीकरण करण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने जेएनपीए कामगार विश्वस्त रविंद्र पाटील यांनी अध्यक्षांकडे केली आहे.
मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या या 15 हेक्टर खाजण क्षेत्रावर ठिकठिकाणी चिखलाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत.या डोंगर आणि क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खारफुटीची झाडे फोफावली आहेत.
खाजण जमीन क्षेत्रावरील चिखलाच्या डोंगरांचे सपाटीकरणांची पारंपरिक मच्छीमारांनी केलेली मागणी आणि पर्यावरणवाद्यांची दुर्मिळ खारफुटीची झाडे नष्ट करण्यासाठी दर्शविलेला विरोध या दोन्ही परस्पर विरोधी मागण्यांमुळे जेएनपीए प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष गौतम दयाल यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती तोडगा काढण्यासाठी सीजीएम जे. वैद्यनाथन यांनी दिली आहे.