

पालघर : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील पारगाव येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून लवकरच उपचार सुरु केले जाणार आहेत.प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात प्री कास्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
सर्वसाधारण सहा ते सात कोटी रुपये बांधकाम खर्च असताना प्री कास्ट मटेरियल वापरून एक ते दीड कोटी रुपयांमध्ये इमारत बांधकाम करून पाच ते सहा कोटी रुपये वाचवण्यात आले असून नऊ महिन्यात बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया मंजुरी स्तरावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी दिली.प्रजासत्ताक दिनी पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाला फेब्रुवारी 2025 मध्ये सुरुवात करण्यात आली होती.सुमारे नऊ महिन्याच्या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.प्री कास्ट मटेरियलचा वापर करुन बांधण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात चार ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती प्री कास्ट मटेरियलचा वापर करून बांधल्या जात आहे. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वे कडील डोंगराळ भागातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी पारगाव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी केली जात होती.
स्थनिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून पाठपुरावा केला जात होता.पाठपुराव्या नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर यांच्या माध्यमातून पारगाव आरोग्य केंद्रास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. डिसेंबर 2024 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते.फेब्रुवारी मध्ये इमारत बांधकामास सुरुवात झाली होती.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी 43 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सहा महिन्यांत इमारती बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असताना तीन महिन्यांचा उशीर होऊन नऊ महिन्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नवीन इमारतीत वैद्यकीय कक्ष, औषध वितरण कक्ष, स्त्री व पुरुष रुग्ण कक्ष, प्रयोगशाळा, आपत्कालीन कक्ष तसेच कॅन्टीन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रातून पारगाव पंचक्रोशीतील गाव पाड्यातील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करून आरोग्य सेवा सुरू करण्याच्या मागणी नुसार आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा सुरु करण्याचे नियोजन केले जात असल्यामुळे पारगाव पंचक्रोशीतील रुग्ण आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.