

पालघर : हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने केळवे रोड परिसरात शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने मोठा अनर्थ टळला. तांत्रिक बिघाड करून हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मुंबईतील जुहू येथून एक हेलिकॉप्टर सरावासाठी सुरतच्या दिशेने निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये ज्युनियर पायलट, सीनियर पायलट, इंजिनियर तसेच आणखी एक व्यक्ती असे एकूण चार जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टर पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि केळवे रोड दरम्यान आले असता, हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा झाल्याचा सिग्नल येऊ लागला. बिघाड झाल्याचा सिग्नल मिळाल्याने पायलटने तातडीने प्रसंगावधान राखत नजीकच्या परिसरात असलेले खुले मैदान शोधले. त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टरची केळवे रोड परिसरातील विद्या वैभव विद्यालयाच्या खुल्या मैदानावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उतरवून सुरक्षितरित्या
आपातकालीन लँडिंग करण्यात आली. हेलिकॉप्टर मैदानात उतरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सफाळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या पायलट इतरांना मदतीबाबत विचारणा केली.
हेलिकॉप्टर सुमारे 40 मिनिटे उभे असल्याने नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, आपत्कालीन लँडिंगनंतर हेलिकॉप्टरमधील पायलट व इंजिनियर यांनी तांत्रिक पथकाशी संपर्क साधला आणि हेलिकॉप्टरमधील बिघाड दुरुस्त केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर सुरतच्या दिशेने न जाता जुहू येथील मुख्य कार्यालयाच्या दिशेने एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास रवाना झाले.