

पालघर शहर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आयोजित जनता दरबारादरम्यान वाढवण बंदराला विरोध झाल्याचे पहावयास मिळाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जवळच हा संपूर्ण प्रकार घडला.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात वाढवण बंदर रद्द करा या मागणीचे निवेदन घेऊन सृष्टी विंदे व अपूर्वा विंदे या वरोर येथील दोन तरुणी व शिष्ठमंडळ आले. दोन तरुणींनी काळ्या रंगाचे टी-शर्ट ज्यावर एकच जिद्द वाढवण बंदर रद्द असे वाढवण बंदराविरोधातील घोषवाक्य लिहिले होते. जनता दरबारात अशा प्रकारचे टी-शर्ट घालून गेल्यास वाढवण बंदर विरोधात घोषणा देण्यात येतील अथवा इतर प्रकार घडून गोंधळाची स्थिती निर्माण होईल
या कारणास्तव खबरदारी म्हणून पोलिसांनी सदरचे टी-शर्ट घालून जनता दरबारात जाता येणार नाही, असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वाराजवळ त्यांना रोखले. त्यावेळी तेथे असलेले वाढवण बंदर विरोधातील इतर संघटनेचे, आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिष्टमंडळातील सदस्यांनी या प्रकाराला विरोध केला. तेथे असलेल्या संघटनेच्या काही पुरुष सदस्यांनी आपल्या अंगातील शर्ट काढून आंदोलनाचा पवित्रा घेत निषेध व्यक्त केला. यामुळे त्या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्यानंतर तैनात करण्यात आला.
पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली आणि आंदोलन करणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एका दालनात नेले. वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या या शिष्टमंडळाची काही वेळानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेत घेतली आणि शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. शिष्टमंडळाचे म्हणणे, मागण्या पालकमंत्र्यांनी या बैठकीत ऐकून घेतल्या. स्थानिकांना वाढवण बंदर प्रकल्पात डावलले जाणार नाही असे पालकमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितल्याचे कळते.