

डोंबिवली : हजारो घरे असलेल्या गृहसंकुलांमधील सांडपाणी थेट गोड्या पाण्याच्या ‘मोती’ नदीपात्रात सोडण्याचा धक्कादायक प्रकार खोणी येथे उघडकीस आला होता. दैनिक पुढारीने या गंभीर प्रकाराचे वृत्त प्रकाशित करताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असून, सोसायट्यांमधून ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात जात असल्याचे त्यांना आढळून आले.
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आपला अहवाल वरिष्ठांना सादर केला असून, वरिष्ठांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.
खोणी पलावा येथील अनेक सोसायट्यांमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने नदीपात्रातील माशांचा मृत्यू झाला असून, जल प्रदूषणामुळे संपूर्ण नदी जलपर्णीने वेढली गेली आहे. यामुळे जैवविविधतेच्या साखळीला मोठा धोका निर्माण झाला असून, नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नियमानुसार विकासकांनी येथे ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) सतत कार्यरत ठेवून सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
गृहसंकुलांतून निघणारे सांडपाणी (टॉयलेट, बाथरूम आणि किचनमधील पाणी) थेट बाहेर न सोडता, त्यावर ‘एसटीपी’मध्ये प्रक्रिया करून ते पुनर्वापरायोग्य बनवणे अपेक्षित आहे. मात्र, विकासकाने येथील एसटीपी केवळ चालू असल्याचे दाखवून पाणी थेट नदीत सोडल्याचे आढळून आले. पुढारीत वृत्त प्रकाशित होताच विकासकाने रातोरात एसटीपी चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी आणि समाजसेवक महेश ठोंबरे यांनी विकासकाचा भांडाफोड केला.
जास्मिन सोसायटीमधून पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे आढळून आले. नदीत मोठ्या प्रमाणात मलजल (टॉयलेटचे नमुने) आढळले. एसटीपीजवळील चेंबरमध्ये पंप बसवून सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.