Election Result KDMC: 27 गावांतील उत्तर भारतीय मतदारसंख्या ‘गेमचेंजर’; भाजपा-शिवसेना आघाडीचे संकेत
नेवाळी : शुभम साळुंके
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये मतदान शांततेत पार पडले आहे. प्रभाग क्रमांक 16, 17, 19 आणि 31 मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानपाडा व हिललाईन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आता हीच अटीतटीची लढत मतपेट्यांमधून आज उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. चारही प्रभागांमध्ये आगरी मतदार सर्वाधिक असले, तरी उत्तर भारतीय मतदारसंख्याही आता आगरी मतदारांच्या बरोबरीला येऊन पोहोचली आहे. हीच बाब यंदाच्या निकालात ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत वरवर पाहता शिवसेना-भाजपा विरुद्ध ठाकरे बंधूंची युती अशी थेट लढत दिसली, मात्र प्रत्यक्ष मैदानात प्रत्येक प्रभागात स्थानिक उमेदवारांची पकड, पूर्वीचे नगरसेवक/नगरसेविका म्हणून असलेली ओळख, आणि मतदारसंघातील समाजघटकांचे गणित यामुळे निकालाची दिशा ठरणार आहे. प्रभाग 19 मधील अ, ब, क जागा बिनविरोध झाल्याने तिथे आधीच एका बाजूची ताकद दिसून येते, तर प्रभाग 16 आणि 17 मध्ये उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे मतविभाजनाचा फटका कुणाला बसतो हे निर्णायक ठरणार आहे.
भूमिपुत्रांनी नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न किंवा 27 गावांच्या प्रश्नावरून भाजपा-शिवसेनेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला, तरी बदललेल्या मतदाररचनेमुळे तो मुद्दा एकट्या जोरावर निकाल उलटवेल, असे चित्र काही प्रभागांमध्ये कठीण दिसत आहे. उलट, संघटनात्मक ताकद, बूथ व्यवस्थापन आणि स्थानिक नेटवर्क जिथे मजबूत आहे, तिथे त्याचा थेट फायदा दिसू शकतो.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उत्तर भारतीय मतदारांचा कल आहे. काही ठिकाणी युतीला उत्साह दिसला तरी उत्तर भारतीय मतदारांचे ‘कल’ एकाच बाजूला झुकले, तर त्याचा फटका ठाकरे बंधूंना 27 गावांमध्ये बसण्याची शक्यता वाढते. विशेषतः जिथे लढत अटीतटीची आहे, तिथे हा घटक निर्णायक ठरू शकतो.
27 गावांमध्ये भाजपा, शिवसेना आघाडीवर असल्याचे संकेत
एकूणच, प्रभाग 16, 17, 19 आणि 31 मध्ये दोन ते तीन जागांवर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांच्या निवडीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र व्यापक चित्र पाहता भाजपा आणि शिवसेना 27 गावांमध्ये तुलनेने आघाडीवर असल्याचे संकेत दिसत असून, बहुसंख्य जागांवर त्यांची बाजी मारण्याची शक्यता जास्त असल्याचे वातावरण आहे. आता अंतिम उत्तर मतपेट्यांमधूनच येईलपण 27 गावांतील बदललेली मतदाररचना आणि विशेषतः उत्तर भारतीय मतदारांचा कल, यंदाच्या निकालाची चावी ठरणार यात शंका नाही.

