
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीचा निकाल आज (दि १६ जानेवारी) लागत आहे. या २९ महापालिका निवडणुकीतील काही महापालिका निवडणुकीचे निकाल हे लक्षवेधी ठरणार आहेत. त्यातील एक महापालिका म्हणजे ठाणे!
ठाण्यात माजी मुख्यमंत्री अन् विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निकालावर त्यांची राज्याच्या राजकारणातील पुढची वाटचाल कशी असेल हे देखील ठरण्याची शक्यता आहे. ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेसमोर उबाठा सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आव्हान असणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गटाने आधीच बिनविरोध नगरसेवक निवडून आणत आपलं खातं उघडलं आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या काही बंडखोर उमेदवारांचादेखील यामध्ये समावेश आहे. गेल्या निवडणुकीत ठाण्यात ५८.८ टक्के मतदान झालं होतं.
गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत १३१ पैकी एकसंध शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे २३ उमेदवार विजयी झाले होते. तर काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळाला होता.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना फुटली आहे अन् बहुतांश माजी नगरसेवक हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे इथं शिवसेना उद्धव ठाकरे गट कशी कामगिरी करतो याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.