

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये अपक्ष उमेदवाराच्या फुगा या चिन्हाचा मशीनमध्ये घोळ झाल्याचा प्रकार उघड झाला आहे, प्रभाग 21 ड मधील अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनवर असलेले फुगा चिन्हाचे बटणच दाबले जात नव्हते. या कारणामुळे मशीन बदलली मात्र त्या मशिनमध्येही आपोआप बीप वाजू लागल्याने यात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय मतदारांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यातील नौपाडा प्रभाग 21 पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या प्रभागातून सर्व नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावर निवडून येत असत. मात्र, 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत युतीशिवाय लढणाऱ्या शिवसेना - भाजपच्या युद्धात या प्रभागात चारही जागांवर भाजपने विजय संपादन केला.
दरम्यान, राज्यातील सत्तेसाठी शिवसेनेत फूट पडून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) असे दोन गट पडले. या खेपेला निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेची युती झाल्याने जागावाटपात नौपाडा प्रभागात सेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने किरण नाकती यांनी प्रभाग 21 ड गटातून बंडखोरी करीत फुगा या चिन्हावर अपक्ष उमेदवारी दाखल केली. किरण नाकती यांच्या समोर भाजपचे सुनेश जोशी अशी तगडी लढत रंगली आहे.
नौपाड्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान यंत्रावरील फुगा या चिन्हाचे बटणच दाबले जात नसल्याच्या तक्रारी मतदारांनी निवडणूक विभागाकडे नोंदवल्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत तासाभराने दुसरी मशिन आणण्यात आली, मात्र, बदललेल्या या मशिनमध्येही मतदानाआधीच आपोआप बिपचे आवाज उमटू लागले. त्यामुळे संशय बळावला असून किरण नाकती यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे.