

पालघर शहर : चुनाभट्टी खाडी पाणथळ भागात बगळे, अन्य जातीचे काही पक्षी मृतावस्थेत काही आणि अर्धमृत अवस्थेत आढळून आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर याच परिसरात स्थलांतरित ब्लॅकहेडेड आयबीस हा पक्ष देखील मृत अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे पक्षीप्रेमी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली असून कारवाईची मागणी केली आहे.
पालघर तालुक्यातील शिरगाव नजीकच चुनाभट्टी हा पाणथळ परिसर असून सातपाटी - मुरबे या दुधखाडीला भरती आल्यावर हे प्रवाहित पाणी चुनाभट्टी भागात काही प्रमाणात जमते या ठिकाणी परिसरातील काही नागरिक मासेमारी देखील करतात. त्याचप्रमाणे पक्षी देखील पाणथळ भाग असल्याने खाद्याच्या शोधात येत असतात.
शिरगाव येथील पर्यावरण प्रेमी अहमद नजीब खलिफा यांना चुनाभट्टी परिसरातील पाणथळ भागात काही दिवसांपूर्वी बगळे व इतर जातींचे पक्षी मृत अवस्थेत व अर्धमृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच परिसरात ब्लॅकहेडेड आयबीस हा स्थलांतरित पक्षी मृत अवस्थेत आढळून आला आहे. भारतासह, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, दक्षिण आशियाई देशात ब्लॅक हेडेड आयबीस म्हणजेच काळ्या डोक्याचा शराटी या पक्षाचे वास्तव्य आहे.
भारतात हे पक्षी निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. दल दल प्रदेश सरोवर यांच्या भागात हा पक्षी राहतो. उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे व पाण्यात राहणारे लहान जीव हे या पक्षांचे खाद्य आहे. ब्लॅकहेडेड आयबीस पक्षी देखील मृत अवस्थेत
आढळून आल्याने पक्षी प्रेमी व पर्यावरण प्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या घटनांची दखल घेऊन चुनाभट्टी येथील पाणथळ भागात पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे याचा शोध घ्यावा, कारवाई करावी आणि पक्षांचे मृत्यू थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पर्यावरण व पक्षीप्रेमींनी केली आहे.