ह्रदयद्रावक : आरोग्यसेवेअभावी जुळ्या बालकांचा मृत्यू : पालघर जिल्‍ह्यातील मोखाडा येथील घटना | पुढारी

ह्रदयद्रावक : आरोग्यसेवेअभावी जुळ्या बालकांचा मृत्यू : पालघर जिल्‍ह्यातील मोखाडा येथील घटना

मोखाडा; पुढारी वृत्तसेवा : देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मोखाडा येथे दु:खद घटना समोर आली आहे. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर (२७) या गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता; परंतु आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने या महिलेला जुळया बालकांचा मृत्‍यू डोळ्यादेखत पहावा लागला. प्रसूतीनंतर आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून दवाखाना गाठावा लागल्याची  घटना समोर आली आहे.

बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर (२७) यांना शनिवारी 13 ऑगस्ट राेजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्‍यांची  घरीच प्रसुती झाली. त्‍यांनी  जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर वंदना यांनाआपल्या मुलांचा मृत्यू पाहावा लागला. दुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने  तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पालघर जिल्ह्यातील  मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज,पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोली करून पायपीट करत दवाखान्यात जावे लागते .  वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या भागाला रस्ता नसल्याने महिनाभरात डोली करून रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्याच्या पाच घटना घडल्या आहेत.

“मोखाडा तालुक्यातील सर्व मुख्य रस्ते बनवले आहेत. कमी लोकसंख्येच्या वाड्यामधील रस्ते झालेले नाहीत. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पात असेही रस्ते घेतलेले आहे. लवकरच अशा सगळ्या वाड्यांवर देखील रस्ते पोहचतील. तोपर्यंत मी आरोग्य विभागाला पावसाळ्यात  दुर्गम भागातील गावांमध्‍ये आरोग्य व्यवस्था उभी करण्याची सूचना दिल्या आहेत.

आमदार सुनील भुसारा,  विक्रमगड विधानसभा

 

 

अतिदुर्गम बोटोशी गावठाण तसेच मरकटवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तातडीने आरोग्य सेवा मिळत नाही.  आरोग्य सेवा अभावी या भागातील नागरिकांचे मृत्‍यू हाेत आहेत. येथे तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून आरोग्य पथक अथवा रेस्‍क्‍यू कॅम्प स्थापन करण्यात यावा.

तुकाराम पवार, माजी सरपंच, बोटोशी ग्रामपंचायत.

हेही वाचलंत का ?

Back to top button