पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल | पुढारी

पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल

पालघर : पुढारी वृत्तसेवा; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात शिंदे गटाने सुरुंग लावण्यास सुरुवात केली. संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या घडामोडीत पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि जिजाऊच्या निलेश सांबरे यांनीही आपल्या नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक थांबा आणि वाट पहा या विचारात असताना आणि ज्यांच्यावर पालघरची जबाबदारी देण्यात आली होती. त्या संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांची हकालपट्टी केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचे ठरविले. शुक्रवारी सायंकाळी पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील वसई – विरार महानगरपालिकेतील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांनी तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांनी युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही हाच निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांच्या सहकार्याने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार श्रीनिवास वनगासुद्धा उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button