लोकसंख्येचे राज्यातील एकमेव घड्याळ पुण्यात | पुढारी

लोकसंख्येचे राज्यातील एकमेव घड्याळ पुण्यात

पुणे : केंद्रीय अनुसंधान केंद्राच्या वतीने आपल्या देशाची व राज्याची लोकसंख्या रोज कळावी, यासाठी पुणे शहरातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्सच्या आवारात पॉप्युलेशन रिसर्च सेंटर हे घड्याळ तीन महिन्यांपूर्वी बसवले आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक आहे. या घड्याळावर संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्याची रोज वाढणारी लोकसंख्या दिसते. 9 जुलै 2022 च्या घड्याळाप्रमाणे 15,07,15,87,82,662 इतकी आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या नोंदीनुसार ही ताजी आकडेवारी आहे.

हे केंद्राच्या कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येते. हे सेंटर महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून, राष्ट्र आरोग्य मिशनअंतर्गत राबविल्या जाणार्‍या योजनांवर संशोधन व सर्व्हे करते. प्रत्यक्षात या केंद्राच्या कामाला 1949 मध्ये सुरुवात झाली आहे, तरीही सक्रिय कामकाज 1963 पासून देशभर सुरू झाले आहे.

लोकसंख्येवर करता येते संशोधन
या ठिकाणी लोकसंख्येवर संशोधन करता येते. तसेच कृषी, अर्थकारण, फायनान्शिअल इकोनॉमिक्स तसेच अर्थशास्त्रातील विविध उपविषयांत पीएचडीदेखील करता येते.

इंग्रजांच्या काळातील सुंदर इमारत
गोखले इन्स्टिट्यूट ही भारतातील अर्थशास्त्रातील अग्रगण्य संस्था असून, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 118 वर्षांपूर्वी सुरू केली. संस्थेच्या आवारात त्या काळातील दगडी बांधकामात बांधलेल्या मजबूत अन् रेखीव इमारती आजही सुस्थितीत आहेत. अग्रभागी गोपाळकृष्ण गोखले यांचा पुतळा आहे. त्यामुळे 118 वर्षांपूर्वी बांधलेले दुमजली भव्य सभागृह लक्षवेधी आहे.

Back to top button