

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
बुद्ध लेण्यांचा राज्यात मोठा लेणी समूह असून, त्यात हजारो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. हा इतिहास उलगडण्यासाठी अनकाई किल्ल्यावर 23 वी कार्यशाळा तब्बल 100 अभ्यासकांच्या उपस्थितीत झाली. कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून धम्मलिपी अभ्यासक सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात वेरूळ, पितळखोरा, अजिंठा, विद्यापीठ, शिवनेरी, जुन्नर, मुंबई, रायगड या ठिकाणी हजारांहून अधिक बुद्ध लेणींचा मोठा समूह आहे. या लेण्यांचा हजारो वर्षांचा इतिहास उलगडून सांगणारे मार्गदर्शकच नसल्याने ही चळवळ गतिमान झाली असून, महाराष्ट्रातील प्रत्येक लेणीवर कार्यशाळा होत आहे. अनकाई किल्ल्यावर वरच्या माथ्यावर दुर्लक्षित असलेल्या महायान व वज्रयान मिश्रपंथीय लेणी समूह आहे. तेथे ही कार्यशाळा झाली.
किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या जैन लेण्यांची माहिती उपस्थित अभ्यासकांना देण्यात आली. लेण्यांच्या निर्मितीमागील इतिहास, तत्कालीन सामाजिक संरचना, कालखंडानुसार झालेली अतिक्रमणे, शिल्पांचा अर्थबोध, धम्मलिपी याची माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. शिल्पकला, शिलालेख संशोधनाविषयीची आवड आणखी वाढल्याचे मनोगत संशोधकांनी व्यक्त केले.
नागपूर, परभणी, जालना, धुळे, मुंबई, भुसावळ, जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर येथील अभ्यासकांनी अनकाई लेण्यांवर एकत्र यावे, हे अत्यंत गौरवास्पद आहे. आपला नष्ट होत चाललेला इतिहास, लेण्यांवर होत असलेली अतिक्रमणे ही दुर्लक्षामुळे होत आहेत. हे थोपवण्याचे कार्य आता दान पारमिता फाउंडेशनअंतर्गत असलेल्या टीमच्या माध्यमातून सुरू झाले असल्याचे कार्यशाळेच्या आयोजकांनी सांगितले.
कार्यशाळेची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली. त्यानंतर 10 मिनिटे आनापान झाले.
कविता खरे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. अनकाई किल्ल्याचा इतिहास गौतम कदम यांनी विशद केला. अनकाई किल्ल्यावर पहिल्या दरवाजाजवळील लेणी समूहातील संपूर्ण शिल्पकलेची माहिती तसेच महायानी व वज—यानी पंथाच्या त्रिमुखी शिल्पकलेचे अनेक पैलू सुनील खरे यांनी उलगडविले. मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्हज् प्रिझर्व्हेशन व रिस्टोरेशन संस्थेच्या माध्यमातून येथे धम्मलिपी वर्ग भरवण्यात आला. कार्यशाळांची वाटचाल विकास खरात यांनी मांडली, तर संतोष आंभोरे यांनी आभारप्रदर्शन केले. सकाळच्या अल्पोपाहाराची, चहाची व्यवस्था रेखा खंडिझोड यांनी, तर जेवणाची व्यवस्था मुकुंद आहिरे व राजू परदेशी व त्यांच्या सहकार्यांनी केली.
यावेळी राहुल खरे, विकास खरात, गौतम कदम, सुरेश कांबळे, सतीश पवार, राजू लहिरे, राजेश सोनवणे, जागृती तुपारे, जया बाविस्कर, प्रवीण जाधव, विजय कापडणे, संतोष आंभोरे, कविता खरे, मोहन सरदार, किरण केदारे इत्यादी अभ्यासक उपस्थित होते.
दुरवस्थेकडे लक्ष वेधणार
अनकाई लेण्यांची दुरवस्था, अस्वच्छता व किल्ल्याकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था बघून सर्व विभागातील लेणी अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली. राज्याचे पर्यटनमंत्री व भारतीय पुरातत्त्व विभागाकडे लवकरच पाठपुरावा केला जाणार आहे.
शिल्पात दडली प्रतीके
तीनमुखी शिल्प हे मंजूश्री बोधिसत्व, अवलोकितेश्वर बोधिसत्व व बुद्ध यांचे प्रतीक समजले जाते. तर बुद्ध धम्मसंघ याचेदेखील प्रतीक समजले जाते. ही लेणी इ. स. 7 व्या ते 8 व्या शतकाच्या प्रारंभी उभारण्यात आलेली आहेत. परंतु या लेण्यांची नोंद पुरातत्व विभागाकडे नाही. त्यामुळे एमबीसीपीआरची टीम याठिकाणी माहिती संकलित करून पुरातत्त्व विभागास सादर करणार आहेत.