कराडात मतदार यादीत घोळात घोळ | पुढारी

कराडात मतदार यादीत घोळात घोळ

कराड : पुढारी वृत्तसेवा कराड नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक घोळ असल्याचे दिसून आले असून एका प्रभागातील मतदारांची नावे दुसर्‍याच प्रभागात गेल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही प्रभागातील सुमारे 200 नावे इतर प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. संबंधित प्रभागातील नगरसेवकांकडे नागरिक धाव घेत असून काही नगरसेवकांनी याबाबत हरकती दाखल केल्या आहेत.

दरम्यान, दि. 27 जून पर्यंत मतदार यादीबाबत हरकती दाखल करण्याची मुदत असून पालिकेमध्ये याबाबत हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचेकडे यादीमधील तफावतीबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कराड नगरपालिकेने मंगळवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करत असतानाच नागरिकांना दुसर्‍याच प्रभागातील यादीत नाव समाविष्ठ झाल्याचे समजले.

प्रभाग क्र. 1 मध्ये प्रभाग क्र. 15 मधील नावे समाविष्ठ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग क्र. 14 मध्यही हाच घोळ झाला असून सुमारे 70 नावे दुसर्‍या प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. तर प्रभाग क्र. 15 मधीलही सुमारे 250 नावे इतर प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. प्रभाग क्र. 4, 5,6, 9, 13 या प्रभागातही असेच घोळ झाले आहेत. काही प्रभागामध्ये आख्या ब्लॉकमधील नावे दुसर्‍या प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. काही प्रभागातील शेवटच्या काही भागातील मतदार शेजारच्या प्रभागामध्ये समाविष्ठ झाली आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यंदा प्रभाग रचनेतही मोठा बदल झाला आहे. त्यामुळे मतदार यादीतही हा घोळ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूका केव्हा लागतील याचा अंदाज नसला तरी याद्या दुरूस्त करणे गरजेचे आहे.

मतदारांच्या हक्‍कावर गदा
एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागातील मतदार यादीत नावे गेल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम झाला आहे. स्वत:च्या प्रभागाव्यतिरिक्‍त इतर प्रभागामध्ये मतदार मतदान करण्यास इच्छुक असणार नाहीत. त्यामुळे मतदारांच्या हक्‍कावर यामुळे गदा येऊ शकते.

नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे
प्रभागात असणार्‍या इच्छुक उमेदवारांनी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. नाव एका प्रभागात आणि मतदान दुसर्‍या प्रभागात असेल तर मतदार मतदान करण्यास जाणार का असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या त्या प्रभागातील इच्छुकांनी आपल्या मतदारांकडे लक्ष देवून हे याबाबत हरकती दाखल कराव्यात, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

मतदार याद्यांमध्ये असणार्‍या हरकतींबाबत दि. 27 जूनपूर्वी मतदारांनी आपल्या हरकती पुराव्यासह दाखल कराव्यात. हरकतींबाबत दुरूस्ती करून याबाबतची अंतिम यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी गोंधळून न जाता हरकती दाखल कराव्यात त्याची नोंद घेण्यात येणार आहे.
– रमाकांत डाके
मुख्याधिकारी

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यांमध्ये प्रचंड चुका आहेत. समाविष्ठ भाग व यादी मधील समाविष्ट मते पाहिली असता प्रभाग सोडून इतर प्रभागातील अनेक मतदारांची नावे इकडे तिकडे झाली आहेत. असा प्रकार शहरातील सर्वच यादीमध्ये झाला असून प्रशासनाने याद्या दुरूस्त कराव्यात.
– प्रमोद पाटील
सामाजिक कार्यकर्ते

Back to top button