

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे दोघे अनेक व्यवसायात भागिदार आहेत. त्यांनी विठ्ठल कारखाना खासगीत चालवण्याचा प्रयत्नही केला होता. तो प्रयत्न सफल झाला नाही. आता युवराज पाटील यांच्या पाठीशी असलेला जनरेटा थोपवण्यासाठी हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सभासदांनी दोघांच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन अॅड. दीपक पवार यांनी केले.
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी युवराज पाटील, रावसाहेब पाटील, दामोदर पवार, बाळासाो पाटील, मोहन बागल, अरुण मोलाने, अमरजित पाटील, दीपक वाडदेकर, सागर यादव, छगन चव्हाण,मल्हारी खरात आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक मोठी रंगात आली आहे. निवडणुकीत तिरंगी सामना होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मंगळवारी गादेगाव येथे युवराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत अॅड. दीपक पवार यांनी भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
अभिजित पाटील यांनी आपणाकडे कारखाना भाडेतत्त्वावर मागितला असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली होती. यापुढे जाऊन अभिजित पाटील यांनी यापोटी आपण अॅडव्हान्स रक्कमही भगीरथ भालके यांना दिली असल्याचे सांगितले होते. यावर पवार यांनी कडाडून टीका केली. आता दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सभासदांनी या दोघांवरही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार यांनी केले.