

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील साईकृपा ऑटो कॉम कंपनीत १० एप्रिल रोजी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. चोरी झालेल्या ३ लाख १५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन चोरटे व दोन विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मालक गिरीश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजूने पत्रा वाकवून आत प्रवेश करून कंपनीतील लोखंडी जॉब, लायनर ग्राइंडर, पंच मटेरियल असा एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. शिंदे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस शिपाई मुकेश गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप भुरे, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, किरण सोनवणे, प्रशांत नागरे, किरण गायकवाड, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, मोतीराम वाघ यांच्या पथकाने संशयित आरोपी साकेत रवि लिंबोळे ( २१ ) व रोहित रवि लिंबोळे ( १९) दोघेही रा. सप्तशृंगीमाता मंदिराजवळ, वरचे चुंचाळे, अंबड) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोहवा चव्हाण व पो. शि. शेख करीत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली