

इंदोरी : हुमणी किडीचा प्रादुर्भाव काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी केले.
कृषी विभागाच्यावतीने नानोली तर्फे चाकण, जाधववाडी, मिंडेवाडी येथे एकात्मीक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे कसे गरजेचे आहे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. भुंगेरे व अळी पिकांचे नुकसान करत असतात. भुंगेरा झाडाची पाने खातात तर अळ्या पिकांची मुळे खातात. प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते. दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत 40 टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास 100 टक्क्यांपर्यत नुकसान होते, असे पाटील यांनी सांगितले.