

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून शहरात 8 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. महापालिकेकडून वारंवार सूचना करुनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरु होते. त्या सर्वेक्षणातून पिंपरी चिंचवड शहरात 8 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या हद्दीत एकूण 8 अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा अनधिकृरित्या चालविण्यात येत होत्या. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्या संबंधित शाळेच्या संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या जात आहेत. मात्र या नोटिशीकडे दुर्लक्ष करत या शाळा बिनदिक्कतपणे सुरु आहेत.
संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले आहेत. शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणार्या नुकसानीस महापालिका शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले आहे.
ज्ञानराज माध्यमिक शाळा, (कासारवाडी), मॉर्डन पब्लिक स्कूल (रहाटणी), मास्टर केअर इंग्लिश स्कूल (भोसरी), ग्रँट मीरा इंग्लिश स्कूल (चिखली), एस.एस.स्कूल फॉर किड्स सांगवी, साई स्कूल ऑफ एक्सलेन्स (पिंपळे सौदागर), सेंट रोझरी इंग्लिश मिडियम स्कूल (चिखली), माने इंग्लिश स्कूल राजवाडेनगर, रहाटणी, काळेवाडी.