नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या महाराष्ट्रात केवळ औटघटकेचा खेळ सुरू आहे. विरोधकांनी आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा किंवा तुरुंगात टाका तरीही आम्ही उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहू, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान असल्याचे नाशिकमध्ये स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी मंगळवारी (दि.२१) मुंबईत केला होता. याबाबत त्यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या घटनेनंतर मंगळवारी रात्री त्यांचे उशिराने नाशिकमध्ये आगमन झाले. बुधवारी (दि. २२) सकाळी ठाण्यातील पोलिस पथकाने नाशिकमध्ये त्यांची भेट घेत जबाब नोंदवून घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधत अनेक आरोप-प्रत्यारोप केले. संबंधित प्रसंग, माहिती व घटना कानावर आल्यानंतर संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांना ती कळवली असून, त्यांचे काम ते करतील. आता माझ्याकडचा विषय संपला आहे. त्यावर मला अधिक बोलायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत अधिक बोलण्यास नकार दिला. गुंड, जन्मठेप, खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत. त्यांच्या चिरंजीवांबरोबर असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांबद्दल आपण अपशब्द वापरला नाही. अमित शाह यांनी आमच्या नेत्याविषयी अपशब्द वापरल्याने त्याच भाषेत मी त्यांना उत्तर दिले, असे सांगत मग शहांविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.
त्यांचा पक्ष खिजगणतीतही नाही
मनसेचे संदीप देशपांडे यांनी राऊत यांना पत्राव्दारे काही सल्ले दिले आहेत, यावर बोलताना, राऊत म्हणाले, कोण संदीप देशपांडे? मला माहीत नाही. तो पक्ष माझ्या खिजगणतीतही नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेता म्हणून निवड झाल्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखविली आहे. त्यांचे ते पाहतील. त्यांच्या कार्यकारिणीचे आम्हाला काय घेणे, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा :