नगर : दोन वर्षांनंतरही 25 बंधारे अपूर्णच! पाटबंधारेची घोडदौड कागदावरच | पुढारी

नगर : दोन वर्षांनंतरही 25 बंधारे अपूर्णच! पाटबंधारेची घोडदौड कागदावरच

नगर; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची तीव्रता वाढताच पाणी टंचाई आणि टँकरचा विषय नेहमीच पुढे येतो. जिल्हा परिषदेच्या बंधार्‍यांतून पाणीप्रश्न काहिसा मार्गी लागला तरी लघु पाटबंधारेच्या उदासिनतेमुळे अजूनही बंधार्‍यांच्या कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याने काही भागाला टंचाईची झळ सोसावी लागण्याची चिन्हे आहेत. सन 2021-22 मध्ये मंजूर 89 बंधार्‍यांपैकी दोन वर्ष उलटत आली असताना, अद्यापही 25 बंधार्‍यांची कामे अपूर्ण असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा पाणीप्रश्न मार्गी लागावा, यासाठी बंधारे आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधार्‍यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र, या कामांना अपेक्षित गती देण्यात विभागाला अपयश आल्याचे दिसून येते. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 50 बंधारे आणि 39 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाली होती. त्यासाठी आवश्यक तरतूदही होती.

मात्र, ही कामे धिम्म्या गतीने सुरू असल्याने दोन वर्ष होत आले तरी कालअखेर 50 बंधार्‍यांपैकी 35, तर कोल्हापूर पद्धतीची 39 पैकी 29 बंधार्‍यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. उवर्रीत 25 बंधार्‍यांची कामे मार्चपूर्वी मार्गी लागतील, असे सांगण्यात आले. मात्र, दोन वर्षात झाली नाही, ती कामे एका महिन्यात कशी होणार, याविषयीही कुतूहल वाढले आहे.

213 हेक्टरला जलसंजीवनी
सन 2021-22 मध्ये हाती घेेतलेल्या 89 बंधार्‍यांच्या कामांतून लाभक्षेत्रातील 213 हेक्टरला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील 25 कामे अजूनही अपूर्ण आहेत. मार्चपूर्वी ही कामे न झाल्यास हा निधी मागे जाऊ शकतो. मात्र, अपूर्ण कामे का आहेत, याकडे प्रशासकांनी एकदाही गांभीर्याने लक्ष घातले नसल्याची चर्चा आहे.

10 कोटींचे 60 बंधारे मंजूर!
नुकत्याच मिळालेल्या प्रशासकीय मान्यतांमध्ये 39 बंधार्‍यांसाठी 5.39 कोटी आणि 21 कोल्हापूर पद्धतीचे बंधारेकरीता 4.67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, मागील 25 बंधार्‍यांची कामेच अपूर्ण असताना आता नवीन बंधारे ल.पा. विभाग कशी पूर्ण करणार, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

Back to top button