पुणे : येरवड्यातील दोन उद्याने चमकली | पुढारी

पुणे : येरवड्यातील दोन उद्याने चमकली

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे ‘बागा व वृक्षसंवर्धन स्पर्धा : 2023’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे शहरातील पाच एकरपेक्षा जास्त जागेतील उद्यानाचे परीक्षण करण्यात आले. यात येरवड्यातील माजी महापौर स्वर्गीय भारत सावंत पाम उद्यानास प्रथम क्रमांक मिळाला. तसेच पाच एकरपेक्षा कमी जागेतील स्पर्धेत याच भागातील लुंबिनी उद्यानास पहिला क्रमांक मिळाला. या उद्यानांच्या कर्मचार्‍यांना प्रशस्तिपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

महापालिकेने आळंदी रस्ता परिसरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुमारे आठ एकर जागेवर पाम उद्यान उभारले आहे. या उद्यानासाठी माजी नगरसेविका शीतल सावंत यांनी प्रयत्न केले आहेत. उद्यानात असलेली हिरवळ, वेगवेगळ्या जातीचे पाम, वॉकिंग ट्रक, खेळणी, विशेष मुलांसाठी असलेली खेळणी, छोटा तलाव, कारंजा, सेल्फी पॉईंट, व्यायामाचे साहित्य, स्वच्छता, देखरेखीमुळे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत पाच एकरांपेक्षा जास्त जागेतील प्रकारात हे उद्यान शहरात प्रथम आले आहे. या भागातील लुंबिनी उद्यानानेदेखील पाच एकरांपेक्षा कमी जागेतील प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणात आणि नीटनीटकेपणाचे योग्य नियोजन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले होते.

लुंबिनी उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी सुसज्ज ट्रॅक तयार केले आहेत. उद्यानात शांतीचा मार्ग सांगणारे गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा उभारल्या आहेत. उद्यानात मध्यभागी गोलाकार योगा हॉल आहे. लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध आहेत. नियमित स्वच्छतेसह उद्यानाच्या वेळा नियमितपणे पाळल्या जात आहेत. स्वच्छ शौचालयाची सुविधा या उद्यानात आहे. दरम्यान, एकाच प्रभागातून दोन उद्याने शहरात अव्वल ठरल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधी, माळी काम, स्वच्छता, देखरेख करणारे कर्मचारी, उद्यान विभागाचे अधिकारी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या 41 वर्षांपासून उद्यान विभागाच्या वतीने स्पर्धा भरविली जाते. परीक्षण करण्यासाठी बाहेरील तज्ज्ञांची टीम असते. यामध्ये उद्यानाची देखरेख, लॉन, कटिंग आदींचे परीक्षण केले जाते. तसेच उद्यानांतील सुविधांचीदेखील पाहणी केली जाते. त्यानुसार या स्पर्धेतील उद्यानांना परितोषिके दिली जातात.
                                       – अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

Back to top button