नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय राज्यभर ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत आश्रमशाळेत अथवा घरी असताना ३५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना निर्बंधांमुळे बहुतांश काळासाठी शाळा बंद असतानाही या वर्षात तब्बल १४६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून दाेन लाखांचे सानुग्रह अनुदान अदा करण्यात आले आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९९९ शासकीय आश्रमशाळा असून, तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्पदंश, विंचू चावणे, विजेचा धक्का, हृदयविकार, ताप, आजारपण, पाण्यात बुडणे अशी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे आहेत. सर्पदंश व विंचू चावल्याने मृत्यू येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या खालोखाल विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण असून, त्यातही एकतर्फी प्रेमप्रकरणातून व्यथित होऊन विद्यार्थी जीवन संपवत असल्याचे समोर आले आहे.
आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मृत्यू हे २०१९-२०, २०२०-२१ या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये झाले आहेत. विद्यार्थ्यांचा शाळेत किंवा घरी व इतरत्र मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३५० विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना हे अनुदान तत्काळ देण्यात आले आहे. तर उर्वरित ३ विद्यार्थी हे आदिवासी नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान नाकारण्यात आले आहे.
दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आश्रमशाळांना भेटीनंतर २७ शिफारशी सुचविल्या होत्या. काही शिफारशी प्रशासनाकडून लागूही करण्यात आल्या आहेत. तरीदेखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरूच राहिल्याने साळुंके समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समोर आले आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आश्रमशाळांना भेटीनंतर 27 शिफारशी सुचविल्या होत्या. काही शिफारशी प्रशासनाकडून लागूही करण्यात आल्या आहेत. तरीदेखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरूच राहिल्याने साळुंके समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
अपर आयुक्तालयनिहाय विद्यार्थ्यांचे मृत्यू
अपर आयुक्त-(२०१८-१९)-(२०१९-२०)-(२०२०-२१)
नाशिक-४२-६२-६२
ठाणे-२१-२६-३६
अमरावती-१५-१८-१८
नागपूर-१०-१३-३०
काय आहेत मृत्यूची कारणे ?
सर्पदंश, विंचू चावणे, विजेचा धक्का, हृदयविकार, ताप, आजारपण, पाण्यात बुडणे अशी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे आहेत. सर्पदंश व विंचू चावल्याने मृत्यू येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.